बिहारमार्गे एन्ट्री : मायदेशी परतताना अटक : खासगी कारमधून 15 दिवस मुक्तपणे संचार
नवी दिल्ली, पटना / वृत्तसंस्था
बिहारमधील सीतामढी येथे भारत-नेपाळ सीमेवर पोलिसांनी रविवारी दोन चिनी नागरिकांना अटक केली. चौकशीत दोघेही सीतामढीमार्गे भारतात दाखल होऊन खासगी कारने दिल्लीला गेल्याचे निष्पन्न झाले. मागील 15 दिवस राजधानी दिल्लीपर्यंत फिरून नेपाळला परतत असताना सीमेवर गस्त घालणाऱया एसएसबीच्या जवानांनी पिलर क्रमांक 301 वरून दोघांना अटक केली. आता त्यांची अधिक चौकशी सुरू करण्यात आली असून घुसखोरीसंबंधी इत्यंभूत माहिती वदवून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भारतात घुसखोरी केलेल्या दोन्ही चिनी नागरिकांची ओळख पटली असून ते वुहान येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. 34 वषीय युआन हैलोंग्झ आणि लू लाँग अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन्ही चिनी नागरिकांना एसएसबीने सुरसंद पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्यावर फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही तरुणांकडून नेपाळपर्यंतच्या व्हिसाव्यतिरिक्त एक काळे कापड, दोन मोबाईल, मोबाईल पॉवर बँक, विविध कंपन्यांची 6 भारतीय सिमकार्ड, 103 डॉलर, भारतीय चलनातील पाचशेच्या चार नोटा, एटीएम कार्ड, सिगारेट, औषध आणि इकॉनॉमी क्लासचा बोर्डिंग पास असा दस्तावेज जप्त करण्यात आला आहे.
प्राथमिक चौकशीत कबुली
‘चीनमधून थायलंडमार्गे काठमांडूला पोहोचलो. तेथून भीथामोड हद्दीपर्यंत सायकलने प्रवास केला. भारतीय हद्दीत आल्यानंतर भाडेतत्वावरील कार घेऊन नोएडामधील जेपी ग्रीन नावाच्या ठिकाणी 25 मे रोजी आपला मित्र कॅरीकडे पोहोचलो. तेथे काही दिवस राहून दिल्लीपर्यंत फिरल्याची कबुली दोन्ही तरुणांनी पोलीस चौकशीत दिली. एसएसबीने पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जात दोन्ही चिनी तरुणांवर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीनंतर दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
खुल्या सीमेमुळे घुसखोरीत वाढ
भारत आणि नेपाळमधील 1,751 किमीच्या खुल्या सीमेमुळे हा मार्ग दहशतवाद्यांसाठी अतिशय अनुकूल मानला जातो. 2017 मध्ये एसएसबीने हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी नसीर अहमद वानी उर्फ सादिकला भारताच घुसण्याच्या तयारीत असताना येथेची अटक केली होती. अलीकडेच एप्रिल महिन्यात भारत-नेपाळ सीमेवरून इमिग्रेशन विभागाने 1.5 कोटी रुपयांच्या चरससह तीन रशियन नागरिकांना अटक केली होती. पकडलेल्या परदेशी नागरिकांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.









