हुक्केरी तालुक्यातील यादगुड येथील दुर्दैवी घटना
बेळगाव : शेततळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी हुक्केरी तालुक्यातील यादगुड येथे ही घटना घडली असून हुक्केरी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. यमनाप्पा प्रकाश रे•sरहट्टी (वय 10), येशू बसाप्पा मादर (वय 14) दोघेही राहणार यादगुड अशी त्या दुर्दैवी मुलांची नावे आहेत. यमनाप्पा व येशू रविवारी क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. क्रिकेट खेळून झाल्यानंतर सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास आंघोळीसाठी ते शेततळ्यावर आले. त्यावेळी ही घटना घडली. सुरुवातीला आंघोळ करताना यमनाप्पाने गटांगळ्या खाल्ल्या. त्याला वाचविण्यासाठी येशू पुढे सरसावला. दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच हुक्केरीचे पोलीस निरीक्षक महम्मदरफिक तहसीलदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस पुढील तपास करत आहेत.









