वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाटणा आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांची लवकरच सर्वोच्च न्यायालयात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विपुल मनुभाई पांचोली यांच्या नावांची सर्वोच्च न्यायालयात बढतीसाठी केंद्राला शिफारस केली. दोन्ही नावे केंद्राने मंजूर केल्यास ऑक्टोबर 2031 मध्ये न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती विपुल मनुभाई पांचोली हे सरन्यायाधीश बनतील. पांचोली हे 21 जुलै 2025 रोजी पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले होते. तर न्यायाधीश आलोक आराधे यांना जानेवारी 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आले होते.
सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या कॉलेजियमने सोमवारी दुपारी विचारविनिमयासाठी बैठक घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या इतर सदस्यांमध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांचा समावेश आहे.









