पुलाची शिरोली/ वार्ताहर
पुलाची शिरोलीतील सांगली फाटा येथे दोन सिरॅमिक दुकानांना आग लागून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. हि घटना कोल्हापूर सांगली राज्य महामार्गालगत सांगली फाटा येथे शनिवारी पहाटे पाच वाजता घडली.
कोल्हापूर सांगली राष्ट्रीय महामार्गा लगत मार्बल लाईन आहे. येथील टोल शेडच्या लगत असणाऱ्या इंगळे सिरॅमिकला पहाटे पाचच्या दरम्यान अचानक आग लागली. दुकानांमध्ये प्लायवूड, रबरी मॅट असल्याने आगीने बघता बघता रौद्ररूप धारण केले. या घटनेची माहिती कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविण्यात आली.
अग्निशमन बंब येईपर्यंत इंगळे सिरॅमिक सेंटर जळून खाक झाले होते. तर या दुकानालगत चंदवानी सिरॅमिक दुकान आहे. इंगळे सिरॅमिक सेंटरला लागलेल्या आगीने चंदवानी सिरॅमिक सेंटरच्या बाजूला लावलेल्या वातानुकूलित मशीनला आग लागून त्याची वायर जळत चंदवानी सिरॅमिक मध्ये घुसली. अग्निशमन दलाचा बंब एकच असल्याने सुरुवातीला आग आटोक्यात आणणे कठीण होते. त्यानंतर अन्य अग्निशमन दलाच्या बंबानाही पाचारण करण्यात आले. तोपर्यंत चंदवानी सिरॅमिकच्या दुसऱ्या मजल्यावर असलेले अति महागडे परदेशी बनावटीचे साहित्य जळून खाक झाले.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी तिन्ही बाजूंनी बंब उभे करून पाण्याचा मारा केला. तर काही जवानांनी दुसऱ्या मजल्यावर चढून काचा खिडक्या तोडून आत प्रवेश करून पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. सुमारे तीन तास आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. या आगीमध्ये दोन्ही दुकानाचे प्रथम दर्शनी लाखों रुपयाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याबाबत शिरोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.