एक वासरू गंभीर जखमी, वाहन चालकावर कारवाईची मागणी
वाळपई : केरी पर्ये मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका वाहनाने धडक दिल्यामुळे मोर्ले येथे दोन गुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक वासरू गंभीर जखमी झाले आहे. त्याला वाळपईच्या गोसंवर्धन केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान दोन गुरांचा मृत्यू झाल्यामुळे मोर्ले भागामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून संबंधित अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अशी की, गुऊवारी पहाटे एका वाहनाने मोर्ले येथील पंपा नजीक धडक दिल्यामुळे दोन गुरांचा जागीच मृत्यू झाला तर एक वासरू गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती स्थानिकांनी गोसंवर्धन केंद्राचे अध्यक्ष हनुमंत परब यांना दिल्यानंतर त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन एकूण परिस्थितीची पाहणी केली. जखमी असलेल्या वासराला ताबडतोब वाळपईच्या गोवर्धन केंद्रात हलविले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिकांनी सदर गुराना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला. जखमी असलेल्या वासराला गाडीत घालण्यासाठी स्थानिकांनी मदत केली. दरम्यान गोवा-बेळगाव महामार्गावर अशा प्रकारचे अपघात घडत असल्याने स्थानिक नागरिकांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. गुरांना धडक देणारे वाहन हे इनोवा आहे. त्या वाहनाविरुद्ध तक्रार लवकरच दाखल करणार असून पोलिसांनी सदर गाडीचा शोध घ्यावा व त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी हनुमंत परब यांनी केली आहे.









