जुने गोवेतील टॅक्सीचालकाची पोलिसांकडून चौकशी : टॅक्सीचालकाने पणजीहून जुनेगोवे, बेळगावला सोडले
म्हापसा : गणेशपुरी म्हापसा येथे डॉ. स्व. मोहन घाणेकर यांच्या बंगल्यात मंगळवारी पहाटे पडलेल्या दरोडाप्रकरणी पोलिसांची दोन पथके कर्नाटक व महाराष्ट्रात पाठविण्यात आली आहेत. दरोडेखोरांनी पणजीहून जुने गोवे येथे आणि तेथून बेळगावपर्यंत जाण्यासाठी वापरलेल्या जुने गोवेतील टॅक्सीचालकाच्या दोन कार जप्त केल्या आहेत. बुधवारी दुपारी म्हापसा पोलिसस्थानकावर या गाड्या आणल्यावर ठसेतज्ञ अधिकाऱ्यांनी गाड्यांचा पंचनामा केला. या दरोड्यात सुमारे 10 लाखांची रोकड, सोन्याचे दागिने मिळून 50 लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी पळविला आहे. दरोडेखोरांना पकडण्यास पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याकडे लक्ष ठेवून आहेत. वरिष्ठ पोलिस सर्वत्र शोध घेत आहे. भरवस्तीत घडलेल्या दरोड्यामुळे गणेशपुरी भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्ही खरोखरच सुरक्षित आहोत काय हा प्रश्न येथे निर्माण झाला आहे.
दरोडेखोरांनी जातेवेळी डॉ. महेंद्र घाणेकर यांची कार घेऊन पळ काढला होता. ती कार त्यांनी मांडवी पुलाखाली ठेवली होती. पणजीतून भाड्याची टॅक्सी जीए-07-एफ-9093 ने दरोडेखोर गेले. वाटेत त्यांनी बेळगावला जायचे असल्याचे सांगितल्याने टॅक्सीचालकाने गोवा बॉर्डर क्रॉस करायची असल्यास दुसरी खासगी गाडी घ्यावी लागेल. म्हणून टॅक्सीचालक त्यांना जुने गोवे येथील आपल्या घरी घेऊन गेला. तेथे दुसरी जीए-05 एफ-1386 नेक्सा या खासगी कारने त्याच टॅक्सीचालकाने दरोडेखोरांना बेळगाव येथे सोडले. ते सर्वजण हिंदी बोलत होते, असे टॅक्सीचालकाने पोलिसांना सांगितले. म्हापसा पोलिसांनी त्या चालकाची जबानी नोंद करून घेतली असून याप्रकरणी उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर अधिक तपास करीत आहेत. दरम्यान पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी म्हापसा पोलिसात भेट देऊन दिवसभराचा आढावा उपअधीक्षक विल्सन डिसोझा व निरीक्षक निखिल पालेकर यांच्याकडून घेतला आहे. याप्रकरणी सर्व बाजूनी तपास सुरू आहे.
आपली आयुष्यभराची पुंजी गेली
वयोवृद्ध महिला सुहासिनी घाणेकर यांच्याकडे इतके लाखो ऊपये कुठले असा प्रश्न सर्व गोमंतकीयांसमोर दरोड्यानंतर उपस्थित झाला असता याबाबत घाणेकर कुटुंबीयांकडून चौकशी केली असता असे सांगण्यात आले की, इतक्या वर्षाची पुंजी सुहासिनी यांनी सांभाळून ठेवली होती. जे दागिने चोरट्यांनी पळविले ते पुरातन कालीन म्हणजे सुमारे साठ वर्षापूर्वीचे होते. आज त्यांची किंमत लाखोंच्या घरात आहे. सुहासिनी यांच्याकडे जमवलेले रु. 12 लाख घरात होते, ते दरोडेखोरांनी चोरून नेले.
बुधवारी गणेशपुरीत छावणीचे स्वरूप
काल बुधवारी सायंकाळी ज्या ठिकाणी दरोडा पडला त्या डॉ. घाणेकर यांच्या निवासस्थानी तसेच भोवतालच्या परिसरात पोलिसांनी शोधाशोध केली. ज्या लेनमध्ये कॅमेरे होते त्या लेनमधून न जाता दरोडेखोरांनी दुसऱ्याच लेनमधून पलायन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच तेथील सर्वांच्या घरांना वा बंगल्यांना सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे उघडकीस आले आहे. दरोडेखोरांनी मोबाईल, सीसी टीव्हीचा डिव्हीडी जाताना पळविल्याने पोलिसांना तपासकामात अडथळा निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलिस गणेशपुरीत शोध घेत होते. गणेशपुरीला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.









