चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लांबविला,नागरिकांत भीतीचे वातावरण
बेळगाव : आनंदनगर, वडगाव येथील चोरीच्या घटनेनंतर जवळच असलेल्या केशवनगरमध्येही बुधवारी रात्री दोन घरे चोरट्यांनी फोडली असून लाखो रुपयांचा ऐवज लांबविला आहे. या घटनेमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी रात्री चोरट्यांनी आनंदनगरमधील चार घरे फोडून लाखोंचा ऐवज लांबविला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना झाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून पोलीसही चक्रावले आहेत. सध्या अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे पोलिसांवर अधिवेशनाचा ताण पडत आहे. हे खरे असले तरी चोरट्यांमध्ये कोणतीच भीती नसल्यामुळे या चोऱ्या घडू लागल्या आहेत. केशवनगर येथील दोन घरे फोडण्यात आली आहेत. एका घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम तर एका घरातून सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे.
दुसऱ्याच दिवशी चोरीची घटना घडल्यामुळे पोलिसांनीही ही घटना दडपण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे. याबाबत शहापूर पोलिसांशी संपर्क साधला असता चोरी झाल्याचे सागितले. मात्र, अद्याप फिर्याद दाखल झाली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आनंदनगर आणि केशवनगर काही अंतरावरच आहेत. समृद्धी कॉलनी येथेही चोरी झाली होती. एकूण या परिसरातच चोरट्यांनी चोरीचे सत्र सुरूच ठेवले आहे. त्यामुळे महिला तसेच विविध व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येळ्ळूर रस्त्यावरील तसेच नेहमी रहदारी असलेल्या या तिन्ही नगरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला आहे. केशवनगर येथे चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. पोलिसांनी पहाटेच घटनास्थळी दाखल होऊन विचारपूस केली आहे. मात्र, अधिक इतरांकडे माहिती पसरवू यासाठी पोलिसांनी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्याच दिवशी या चोरीमुळे आता जनतेलाच रात्रीची गस्त घालावी लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केशवनगरला पोलीस अधिकाऱ्यांची भेट
गेल्या दोन दिवसांपासून आनंदनगर, केशवनगर परिसरात घरफोडींचे सत्र सुरू आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी रात्री शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक पुजारी यांनी केशवनगर परिसरात आले. त्यांनी येथील नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र जनतेनेही तितकेच सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी या परिसरातील तरुणांनी तसेच नागरिकांनी पहाटेची गस्त घालू असे सांगितले. सर्वांनी सावध राहण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.
रहिवासी संघटनेची बैठक
आनंदनगर येथे एकाच रात्रीत चार घरे फोडून चोरट्यांनी किमती ऐवज लांबविला. तर एक घर फोडण्यामध्ये ते अयशस्वी ठरले. त्यामुळे आनंदनगर रहिवासी संघटनेने तातडीने बैठक घेतली. प्रत्येकाने सावधानता बाळगणे, त्याचबरोबर रात्रीच्या वेळी तरुणांनी काही वेळ गस्त घालणे याबाबत चर्चा झाली. केशवनगर येथेही बैठक झाली. त्या बैठकीमध्येही चर्चा झाली आणि त्याच दिवशी रात्री तेथे घरफोडी झाली.









