तासगाव :
तालुक्यातील गव्हाण येथील लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत नियमांची अपेक्षित अशी अंमलबजावणी करण्यात आली नाही. प्रशासनाचे नियमांची अंमलबजावणी न करता शर्यत घेण्यात आली. या शर्यतीत बैलगाडीवरील ताबा सुटल्याने बैलजोडी मणेराजुरी हद्दीतील तलावात गेली. बैलांना कासरा व सापत्यांचा फास लागला. त्यामुळे तलावात बुडून दोन बैलांचा मृत्यू झाला. या शर्यतीदरम्यान बैलांचा प्रचंड छळ करण्यात आला. प्रशासनाने या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते.
गव्हाण येथील लक्ष्मी देवी यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम होते. बुधवारी सकाळी बैलगाडी शर्यती होत्या. त्यासाठी विक्रम नंदकुमार यादव यांच्या अर्जानुसार प्रशासनाने ३५ अटी घालून शर्यतीस परवानगी दिली होती. तर निवासी नायब तहसीलदार प्रकाश बुरगले, पोलीस उपनिरीक्षक विनय गोडसे यांची बैलगाडी मैदानावर नियुक्ती करण्यात आली होती.
सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान आदत गटातील बैलगाड्या सोडण्यात आल्या. मात्र बैलगाड्या सोडण्यापूर्वी प्रशासनाने सुरक्षेच्या बाबींची शहानिशा करणे गरजेचे होते. मात्र केवळ कागदे रंगवली गेली. त्यामुळे अटींचे उल्लंघन करत बैलगाडी शर्यती सोडण्यात आल्या.
शर्यतीसाठी जास्तीत जास्त एक किलोमीटरचे अंतर दिले असताना यात्रा कमीटीने अडीच ते तीन किलोमीटर बैलगाड्या पळवल्या. या बैलगाड्या मणेराजुरी हद्दीतील साठवण तलावापासून परत येणार होत्या. मात्र संतोष पांढरे (रा. शिंगणापूर) व संतोष गलांडे (रा. अंकले, ता. जत) यांच्या बैलजोडीला या तलावाजवळ परत फिरता आले नाही. ही बैलजोडी थेट सुमारे ३० फुट तलावात गेली. यावेळी बैलांच्या गळ्यातील सापत्या व कासऱ्याचा बैलांना फास लागला. त्यामुळे बैलांचा बुडून मृत्यू झाला.
शर्यतीचे निरीक्षण करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेले निवासी नायब तहसीलदार प्रकाश बुरगले, पोलीस उपनिरीक्षक विनय गोडसे यांनी अपेक्षित असे लक्ष दिले नाही. त्यामुळे यात्रा कमीटीने रेटून नियम बाजूला ठेवून बैलगाड्या शर्यती घेतल्या.








