पुणे / वार्ताहर :
शहरातील कॅम्प परिसरात जुन्या वादातून एका टोळक्याने अतिक्रमण विभागात कामाला असलेल्या तरुणासह त्याच्या भावावर धारधार शस्त्राने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर हातातील शस्त्रे हवेत फिरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
अनिरुद्ध जगताप (वय 25) आणि पंकज जगताप (23) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी अॅलेक्स गवळी याच्यासह 10 ते 12 जणांविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध हे पुणे कॅन्टोनमेंटमध्ये अतिक्रमण विरोधी पथकात कामाला आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या ओळखीतील अॅलेक्ससोबत त्यांची वादावादी झाली होती. त्याचा राग अॅलेक्सला होता. अनिरुद्ध, पंकज आणि त्यांचे मित्र 19 जूनला रात्रीच्या सुमारास कॅम्प परिसरात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी चार ते पाच दुचाकीवर आलेल्या 10 ते 12 जणांच्या टोळक्याने अनिरुद्धच्या डोक्यात वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. इतर साथीदारांनी पंकजवर हल्ला करुन त्यालाही जखमी केले. त्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी या टोळक्याने शस्त्रे हवेत फिरवली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.









