वार्ताहर,मार्गताम्हाने
Accident News : चिपळूणकडे कामानिमित्त दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघां सख्ख्या भावांचाा शुकवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास उमरोली-गायकरवाडी येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, त्यांच्या दुचाकीचे दोन तुकडे झाले. भावेश भगवान पालांडे ( वय-21) व यश भगवान पालांडे (वय-17) अशी या दोन भावांची नावे आहेत. त्यांच्या अपघाती मृत्यूचे शनिवारी सकाळी वृत्त समजताच मार्गताम्हाने परिसरात शोककळा पसरली.
खेड तालुक्यातील सार्पिली येथील पालांडे कुटुंब चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने खुर्द येथे आपल्या आजोळी कित्येक वर्षे वास्तव्यास आहे. भावेश व यश हे दोन भाऊ आपल्या आई-वडिलांसह येथे राहत होते. शुक्रवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास दोघेही भाऊ दुचाकीने चिपळूणच्या दिशेने जात होते. उमरोली गायकरवाडीजवळ मोरीवर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यांना चिपळुणातील लाईफकेअर रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तेथेच त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीच्या झालेल्या नुकसानीवरुन येथे वळण व एकेरी मार्ग असल्याने दुचाकी वेगात असावी व ती रस्त्यालगतच्या कठड्यावर आदळली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
यातील भावेश हा मुंबईला नोकरीला असून, सध्या तो गावाला आला होता.तसेच यश हा वाहने दुरुस्तीचे काम शिकत होता.यशने यावर्षी 12 वीची परीक्षा दिली होती.दोन्ही भावांचे वाढदिवसही मे महिन्यातच होते.भावेशचा वाढदिवस 6 मे रोजी झाला होता,तर यशचा वाढदिवस 26 मे रोजी होता. यश हा अभ्यासात खूप हुशार होता. शवविच्छेदन कामथे येथे करण्यात येऊन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.या दोन्ही मृतदेहांवर त्यांच्या मूळ गावी सापिर्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
उमरोली परिसर पूर्वीपासूनच धोकादायक
उमरोली परिसर हा पूर्वीपासूनच धोकादायक व अपघातपवण भाग आहे. येथे अनेकांचे अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाले आहेत. नेमके येथे मोठे वळण असून समोरुन येणारी वाहने लगेच लक्षात येत नाहीत व दोन्ही दिशा उताराच्या असल्याने वाहकाचे वेगावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे येथे वारंवार अपघात होत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. तसा गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणात येथे कामही चांगले झालेले नसल्याचे बोलले जात आहे.
Previous Articleमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर सिद्धरामय्या म्हणाले, निवडणूकीपूर्वी दिलेले वचन पूर्ण करणार
Next Article Khed News : लोटेत छतावरून पडून कामगार गंभीर जखमी









