गोकाक तालुक्यातील घटनेने हळहळ
बेळगाव : लहान भावाच्या निधनाची बातमी ऐकून मोठ्या भावाचाही हृदयाघाताने मृत्यू झाला. शनिवारी गोकाक तालुक्यातील कपरट्टी येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने या दोन्ही भावंडांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सतीश बागन्नावर (वय 16), बसवराज बागन्नावर (वय 24) असे त्या भावंडांचे नाव आहे. दहावीत शिकणाऱ्या सतीशची प्रकृती बिघडल्याने त्याला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. शनिवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. सतीशच्या निधनाची बातमी समजताच त्याच्या धक्क्याने मोठा भाऊ बसवराज कोसळला. हृदयाघाताने त्याचा मृत्यू झाला.
बसवराज हा एका कापड दुकानात काम करीत होता. त्याची पत्नी पवित्रा गर्भवती आहे. पती निधनाच्या धक्क्याने तीही कोसळली. कुटुंबीयांनी तिला खासगी इस्पितळात दाखल केले. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. एकाच दिवशी दोन मुलांच्या निधनाने या गरीब कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही भावंडांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सतीश व बसवराजच्या आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सतीशला आरोग्य समस्या नव्हती. त्याचा भाऊ बसवराजही सुदृढ होता. शाळा शिकण्याबरोबरच सतीश शेतीही करीत होता. तर बसवराज कापड दुकानात काम करून घर चालवत होता. एकाच दिवशी या दोन्ही भावंडांवर मृत्यूने झडप घातली आहे.









