प्रतिनिधी/ मुंबई
दक्षिण मुंबईतील कुलाबा नेव्ही नगर या अतिसुरक्षित परिसरातून नौदलाच्या रायफल चोरी प्रकरणी तेलंगणातील नक्षलग्रस्त भागातून दोन भावांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. इंसास रायफल, तीन भरलेल्या मॅगझीन व 40 काडतुसांची चोरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी केरळ येथील कोची नौदलात यापूर्वी कार्यरत होता. त्यानंतर त्याने काही महिने मुंबईतही काम केले होते. अटक करण्यात आलेले दोघे चोरलेली इंसास रायफल नक्षलवाद्यांना विकण्याच्या तयारीत होते का, याबाबत पोलीस अधिक तपास करण्यात येत आहे. राकेश डुबाला आणि उमेश डुबाला या दोन आरोपींना तलंगणा येथील असिफा जिह्यातील येळगापल्ली गावातून अटक करण्यात आल्याचे उपायुक्त (गुन्हे) राज तिलक रौशन यांनी सांगितले. दोघेही तेथील रहिवासी असून तेथे शिधावाटप दुकान चालवतात. ते दोघे 4 सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल झाले होते, दोन दिवस त्यांनी मुंबईतील कुलाबा येथील नोदलाच्या आतील परिसराची रेकी केली.
राकेश कोची येथे नौदलात कार्यरत होता. काही दिवस तो मुंबईत कार्यरत होता. राकेश बंदोबस्ताला तैनात असलेल्या नाविकांची डांगरी घालून 6 सप्टेंबर रोजी नेव्हीनगरमध्ये गेला होता, सायंकाळी 7.30 वाजता तो एपी टॉवर्स या प्रतिबंधित परिसरात गेला होता. त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या एका जवानाला अतिदक्षतेचा इशारा असल्याचे त्याने सांगितले. यापुढे मी या ठिकाणी बंदोबस्ताला तैनात असेन, असे सांगून त्याने तेथे कार्यरत असलेल्या जवानाकडील इंसास रायफल, 3
मॅगझीन आणि 40 जिवंत काडतुसे घेतली व त्या जवानाला वसतिगफहात जाण्यास सांगितले. त्यावेळी राकेशचा भाऊ नेव्ही नगरच्या बाहेर उभा होता. राकेशने भींतीवरून रायफल व काडतुसे असलेली बॅग फेकली. त्यानंतर राकेशही तेथून पळून गेला.









