बीसीसीआयचा निर्णय : वेगवान गोलंदाजांना होणार फायदा: आगामी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेपासून होणार सुरुवात :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टी-20 क्रिकेट म्हणजे फलंदाजांचा खेळ, असे अनेकदा बोलले जाते. पण बीसीसीआय ही ओळख पुसण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. देशांतर्गत टी-20 क्रिकेटमध्ये बीसीसीआय येत्या काळात महत्वाचा बदल करणार आहे. आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गोलंदाजाला एका षटकात दोन बाऊन्सर टाकता येणार असल्याचे बीसीसीआयने शनिवारी स्पष्ट केले.
दरम्यान, बीसीसीआयने हा निर्णय विचारपूर्वक घेतल्याचे दिसत आहे. आयपीएलमध्येही येत्या काळात गोलंदाजांना प्रत्येक षटकात दोन बाऊन्सर टाकण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मागील वर्षी इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमाबाबत असे झाले होते. आयपीएलमध्ये हा नियम वापरात आणण्याआधी बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत हा नियम वापरला होता. अशामध्ये बाऊन्सरबाबतचा हा निर्णय मुश्ताक अली ट्रॉफीत यशस्वी ठरला, तर आगामी आयपीएलमध्येही याचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी झालेल्या बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नव्या नियमाविषयी थोडेसे
टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला एका षटकात जास्तीत जास्त एकच बाऊन्सर टाकण्याची परवानगी होती. वनडे आणि कसोटीत मात्र, षटकात दोन बाऊन्सर टाकता येतात. अशामध्ये बीसीसीआयने वनडे आणि कसोटी क्रिकेटप्रमाणेच सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीतही एका षटकात दोन बाऊन्सरला परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे फलंदाज आणि गोलंदाजांमधील स्पर्धा अधिकच रोमांचक होईल, असे बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने सांगितले. यंदाच्या आयपीएलमध्ये बहुतांश सामन्यांमध्ये संघ 200 पेक्षा मोठी खेळी करताना दिसले. यामध्ये गोलंदाजांपेक्षा फलंदाजांचे पारडे जड वाटत होते. आता या नवीन नियमाचा गोलंदाजांना कितपत फायदा होतो, याकडे जाणकारांचे लक्ष असेल.
इम्पॅक्ट प्लेयरचा नियम राहणार
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये प्रभावशाली खेळाडूंचा नियम कायम राहणार आहे, परंतु यावेळी त्यात काही बदल करण्यात आले आहेत. नाणेफेकीपूर्वी 4 पर्यायी खेळाडूंसह 11 खेळाडूंची नावे जाहीर करावी लागणार आहेत. याशिवाय हा नियम सामन्यात केव्हाही वापरता येईल. यापूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू करण्यात आला होता. यामध्ये 14 व्या षटकाच्या आधी केवळ इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करता येत होता. यामुळे अष्टपैलू खेळाडूंची कारकीर्द धोक्यात येईल, असे मानले जात आहे.
आशियाई स्पर्धेत संघ सहभागी होणार
चीनच्या हाँगझाऊमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बीसीसीआयने मान्यता दिली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही स्पर्धा होणाऱ्या असल्याने भारताचा युवा संघ या स्पर्धेत भाग घेईल. तसेच महिलांचा मात्र पूर्ण ताकदीचा संघ स्पर्धेसाठी रवाना होईल. या स्पर्धांना 28 सप्टेंबरपासून सुरुवात होईल.
अफगाणविरुद्ध मालिकेला मुहूर्त
भारतीय संघाचे वेळापत्रक मागील जवळपास दोन वर्षांपासून व्यस्त आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आयपीएल व देशांतर्गत क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याने काही मालिकांना अद्याप वेळ मिळालेला नाही. जून महिन्यात भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान मालिका खेळवली जाणार होती पण भारतीय संघाच्या वेळापत्रकामुळे ही मालिका अद्याप खेळवली गेली नाही. ही वनडे मालिका आधी जून महिन्यात होणार होती. मात्र दोन्ही क्रिकेट बोर्डाच्या सहमतीने ही मालिका पुढे ढकलण्यात आली होती. पूर्वी ही तीन सामन्यांची मालिका 23 जून ते 30 जून या दरम्यान होणार होती. आता ही मालिका जानेवारी 2024 मध्ये होणार असल्याचे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय संघ या मालिकेचे यजमानपद भूषवेल.









