कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते कुणाल घोष यांच्या दाव्यामुळे बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपचे दोन खासदार 21 जुलै रोजी तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपच्या दोन खासदारांनी 21 जुलै रोजी आयोजित होणाऱ्या ‘शहीद दिन’ सभेदरम्यान तृणमूलमध्ये समील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तृणमूल अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी सर्व पैलूंवर विचार करत यासंबंधी अंतिम निर्णय घेणार असल्याचे घोष यांनी म्हटले आहे. अलिकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपचे 12 खासदार निवडून आले आहेत. यातील दोन जण आमच्या संपर्कात आहेत.
त्यांनी आमच्याशी संपर्क साधून तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होण्याची इच्छा दर्शविली आहे. भाजपचे हे खासदार ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात काम करू इच्छितात आणि 21 जुलै रोजी ते पक्षात सामील होऊ शकतात. या खासदारांचे नाव आताच उघड करता येणार नाही. या खासदारांना तृणमूलच्या नेतृत्वाने पक्षांतरविरोधी कायद्याच्या कक्षेत येण्यापासून वाचण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला असल्याचा दावा घोष यांनी केला. कुणाल घोष अनेकदा अशाप्रकारचे दावे करत असल्याने त्यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. यापूर्वी देखील आम्ही घोष यांच्यासारख्या नेत्यांचे दावे पाहिले आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री सुकांत मजूमदार यांनी म्हटले आहे.









