स्थानिकाच्या भंगार अड्डय़ावर करत होते काम : भारतीयत्वाची कोणतीच ओळखपत्रे नाहीत
प्रतिनिधी /मडगाव
सासष्टीच्या किनारपट्टी भागात बांगलादेशी घुसखोरांनी शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. या पूर्वी वार्का येथून बांगलादेशींना अटक केल्यानंतर शनिवारी रात्री ओडली येथून 2 बांगलादेशींना ताब्यात घेतले आहे. मडगाच्या स्पेशल ब्रँचने ही कारवाई केली. ताब्यात घेतलेल्यांची नावे करीम फझल करीम (50) व शहीन फझल करीम (40) अशी आहेत.
ताब्यात घेतलेले दोघेही भाऊ असून त्यांच्या सोबत दोन लहान मुलेही आढळली आहेत. सध्या कोलवा पोलिसांकडून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. या संशयितांना ते रहात असलेल्या ठिकाणीच स्थानबद्ध म्हणजे गृह निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
भारतीय ओळखपत्रे नाहीत
दोघेही भारतीय असल्याची कोणतीच कागदपत्रे त्यांच्याकडे नाहीत. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ओळखपत्राची व अन्य कागदपत्रांची पोलीस छाननी करीत आहेत. त्यांना विदेश नोंदणी कार्यालयात स्वाधीन केले जाईल, असे कोलवा पोलीस स्थानकाचे निरीक्षक फिलोमीन कॉस्ता यांनी स्पष्ट केले आहे.
ओडली येथील फिलीप फर्नांडिस यांच्या भंगार अड्डय़ात त्यांचा मुक्काम होता. या भंगार अड्डय़ाच्या मालकाची देखील सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भंगार अड्डय़ावर या दोघांना ठेवताना त्यांच्याकडून कागदपत्राची पहाणी केली होती की नाही याची देखील माहिती पोलीस जाणून घेणार आहेत.
वैध कागदपत्रे नसताना बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱया बांगलादेशींचे प्रमाण गोव्यात वाढले आहे. एटीएस अधिकाऱयांनी या पूर्वी कारवाई करून 20 हून अधिक बांगलादेशींना ताब्यात घेतले होते. त्यात वाळपई, डिचोली, कोलवाळ व वार्का येथे ही कारवाई करण्यात आली होती.
ग्रामसभांमध्ये भाडेकरुंचा विषय
सासष्टीतील अनेक पंचायतीच्या ग्रामसभांतून भाडेकरूंचा मुद्दा वेळोवेळी उपस्थित होत आलेला आहे. घरमालकांनी भाडेकरू ठेवल्यानंतर त्याची माहिती त्वरित नजिकच्या पोलीस स्थानकात देणे बंधनकारक असताना देखील त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामसभांतून नाराजी व्यक्त झालेली आहे.
अन्यथा भाडेकरु मालकांचीही कसून तपासणी होणार : मुख्यमंत्री

भाडेकरुंची पोलीस तपासणी केल्यानंतरच त्यांना राहण्यासाठी खोल्या देण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले असून तसे न करता भाडेकरुंना राहण्यास खोल्या देणाऱया मालकांची चौकशी करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. बांगलादेशी घुसखोर शोधून काढण्याचे काम चालू असून ज्यांनी त्यांना राहण्यास दिले त्यांचाही तपास होणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, आतापर्यंत सापडलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडे ते गोव्यात, देशात कशासाठी आलेत याचे कोणतेही पुरावे नाहीत. त्यांच्याकडे असलेली आधारकार्डे बोगस असून ती कार्डे खासगी एजन्सी करुन देत असल्याने ती कोणीही करुन घेऊ शकतो. गोव्यात सापडलेल्या आणि अटक करण्यात आलेल्या बांगलादेशींची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयास देण्यात आली असून त्यांची त्यांच्या देशात पाठवणी करण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
ते बांगलादेशी गुन्हेगारी कृत्ये, बेकायदेशीर धंदे, व्यवसायात गुंतल्याचे समोर आले आहे. भाडेकरु तपासणी विधेयक गोव्यात मंजूर करण्यात आले आहे. त्याद्वारे त्यांच्याकडे भारतीय पत्ता असलेली कोणतीही कागदपत्रे नाहीत. त्यामुळे ते गोव्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत असल्याचे आढळून आले आहे. अशा लोकांना थारा न देता त्यांना परत पाठवणार असल्य़ाचे डॉ. सावंत यांनी नमूद केले.








