दुकानासमोर रिक्षा उभी केल्याचे निमित्त
बेळगाव : दुकानासमोर ऑटोरिक्षा का उभी केली? अशी विचारणा केल्यामुळे दोघा भावंडांवर चाकू, मुष्टी व तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास खडेबाजार येथील शीतल हॉटेलसमोर ही घटना घडली आहे. याप्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात चौघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उमेर खालिद मणियार (वय 26), त्याचा भाऊ उझेर खालिद मणियार (वय 22) दोघेही राहणार उज्ज्वलनगर अशी जखमींची नावे आहेत. गळ्यावर तलवारीने हल्ला केल्यामुळे उमेर गंभीर जखमी झाला आहे. त्याला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. चाकू व मुष्टीने हल्ल्यात जखमी झालेल्या उझेरवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
यासंबंधी शिराज देसाई व अमजद देसाई, दोघेही राहणार कसाई गल्ली यांच्यासह दोघा अनोळखींवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर व उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. उमेरचे शीतल हॉटेलजवळ मोबाईल रिपेरीचे दुकान आहे. रमजानमुळे त्याने आपल्या दुकानासमोर कॉस्मेटिक विक्रीचा स्टॉल घातला आहे. या स्टॉलवर वडील व दोघे भाऊ बसले होते. बुधवार दि. 19 मार्च रोजी रात्री 11 वाजता ऑटोरिक्षा उभी करण्यात आली. त्यावेळी या भावंडांनी रिक्षा थोडी पुढे लावा, असे सांगितले. त्यानंतर उभयतांत वादावादी होऊन चाकू, तलवार व मुष्टीने हल्ला करण्यात आला.









