100 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त
बेळगाव : चोरी प्रकरणी एका जोडगोळीला अटक करून त्यांच्याजवळून साडेसहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली असून या प्रकरणात अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, उपनिरीक्षक एच. एल. केरुर, आय. एस. पाटील, लक्ष्मण कडोलकर, शिवाप्पा तेली, शंकर कुगटोळी, सुरेश कांबळे, कार्तिक आदींनी ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टीन मार्बन्यांग यांनी चोरी प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे. चंद्रकांत उर्फ प्रेम संतोष कोटगी (वय 19, रा. पांगुळ गल्ली), ओमकार भावकाण्णा पाटील (वय 20 रा. कलखांब) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. सोबत काही अल्पवयीन मुलांना घेऊन या जोडगोळीने चोऱ्या, घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे.
3 फेब्रुवारी 2024 रोजी महाद्वार रोड येथील रुपाली विनायक बिर्जे यांच्या घरी चोरी झाली होती. या प्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. रुपाली यांच्या घरी चोरण्यात आलेले दागिने विक्रीसाठी हे दोघे जुन्या भाजी मार्केटजवळ आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. या जोडगोळीने महाद्वार रोड, कलखांब, बसवण कुडची येथे चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याजवळून 6 लाख 48 हजार किमतीचे 100 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. त्यांनी मार्केट, मारिहाळ व माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून अटकेची कारवाई पूर्ण करून जोडगोळीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.









