चिपळूण :
बंदुकीची गोळी थेट खिडकीची काच फोडून स्वंयपाकघरात घुसल्याची घटना शहरातील गोवळकोट रोड हायलाईफ या इमारतीत जून महिन्यात घडली होती. याबाबतचा पोलीस तपास सुऊ असताना अखेर या प्रकरणी दोघांना चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे. विनापरवाना बंदुकीतून डुकराच्या शिकारीसाठी ही गोळी झाडल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी ही बंदूकही जप्त केली आहे. सोमवारी या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
विशाल विजय पवार (36, पेठमाप), नितीन धोंडू होळकर (30, कोंढे) अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहरातील गोवळकोट रोड ठिकाणी हायलाईफ ही तीनमजली इमारत असून त्यामध्ये पहिल्या मजल्यावर अशरफ तांबे यांची सदनिका आहे. 29 जून रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एक बंदुकीची गोळी खिडकीची काच फोडून या सदनिकेच्या थेट स्वंयपाक खोलीत घुसली होती. भरदिवसा झालेल्या खळबळजनक प्रकारानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून या बाबतचा तपास सुरू असताना ही बंदुकीची गोळी शिकारीच्या उद्देशाने झाडल्याची माहिती पुढे आली होती. हाच धागा पकडून पोलिसांनी त्या अज्ञाताच्या शोधासाठी तपास गतिमान केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी विशाल पवार, नितीन होळकर या दोघांना अटक केली.
पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता विशाल पवार याची हायलाईफ इमारतीच्या बाजूला भातशेती आहे. त्या ठिकाणी डुकराचा वावर असल्याने त्यांच्या शिकारीसाठी त्याने नितीन होळकर याला बोलावले होते. नितीन हा विनापरवाना बंदूक घेऊन त्या ठिकाणी आला व त्याने शिकारीच्या उद्देशाने सिंगल बोअरच्या बंदुकीतून गोळी झाडली. मात्र या गोळीचा नेम चुकल्याने ही गोळी थेट अशरफ तांबे यांच्या सदनिकेच्या खिडकीची काच फोडून स्वंयपाकघरात घुसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी गोळीबार केलेली बंदुकही पोलिसांनी जप्त केली आहे. अटक केलेल्या विशाल पवार, नितीन होळकर याला सोमवारी न्यायालयात हजर केले करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, पोलीस हेडकॉन्स्टेबल वृशाल शेटकर, संदीप माणके, प्रितेश शिंदे, रोशन पवार, ऊपेश जोगी आदींच्या पथकाने केली.








