सावंतवाडी –
अवैधरित्या सुमारे सव्वा दोन लाख किंमतीच्या गुटखाची वाहतूक करताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करीत दोघांना अल्टो गाडीसह ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी ओटवणे- चराठा मार्गावर करण्यात आली. याप्रकरणी बाबाजी विजय नाईक (42 रा- खासकीलवाडा सावंतवाडी) व उमेश रघुनाथ सावंत (50, वायंगणी ता.मालवण )या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने दिली. अल्टो गाडीतून अवैधरित्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची ओटवणे येथून वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाचे निरीक्षक समीर भोसले, सहाय्यक निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, हवालदार प्रकाश कदम व जयेश करमळकर यांनी मंगळवारी सायंकाळी चराठा येथे सापळा रचला होता. ओटवणेच्या दिशेने येणारी अल्टो कार तपासणीसाठी थांबवण्यात आली. कारची तपासणी केली असता कार मध्ये शासनाने प्रतिबंध केलेला 2 लाख 38 हजार रुपये किमतीचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ असा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी (बाबाजी नाईक, सावंतवाडी) व (उमेश सावंत, मालवण )या दोघांना ताब्यात घेतले तसेच वाहतुकीस वापरलेली एक लाख रुपये किंमतीची अल्टो कार जप्त करण्यात आली. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.









