हॉटेलमध्ये शिरुन दोघांनी केली निर्घृण हत्या : घटना सीसीटीव्हीत कैद
प्रतिनिधी / बेळगाव
हुबळी येथील चंद्रशेखर गुरुजी हत्या प्रकरणी रामदुर्गजवळ दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. सरल वास्तू’च्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख केलेले आणि प्रसिद्ध वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची आज दुपारी हुबळी येथील एका हॉटेलमध्ये चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्येची ही संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्हीत कैद झाली . भरदिवसा हॉटेलच्या रिसेप्शनवर घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.
चंद्रशेखर अंगडी हे हुबळी येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी दोन इसम आले. या इसमांची भेट घेण्यासाठी चंद्रशेखर गुरुजी रिसेप्शनवर गेले. त्यावेळी त्या दोन तरुणांनी सुरुवातीला चंद्रशेखर गुरुजी यांच्यासोबत बोलण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान त्या दोघांनी आपल्याकडील चाकू काढून चंद्रशेखर गुरुजी यांच्यावर चाकूने वार केले. ही संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे की, ज्यावेळी आरोपींनी चंद्रशेखर गुरुजी यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली त्यावेळी घटनास्थळी आणखी काही नागरिक आणि हॉटेलचा स्टाफही उपस्थित होता. नेमकं काय घडलं हे सुरुवातीला कुणालाच कळालं नाही. अखेर नंतर थोडी हिंमत करत काहींनी चंद्रशेखर गुरुजी यांच्या दिशेने चाल केली. मात्र, आरोपींनी आपल्याकडील चाकूचा धाक दाखवत त्यांना रोखले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चंद्रशेखर गुरुजी हे आपल्या काही कामासाठी हुबळी येथे आले होते आणि त्याचवेळी ही घटना घडली.चंद्रशेखर गुरुजी हे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्या दोन इसमांना भेटले आणि त्या आरोपींनी चंद्रशेखर गुरुजींवर चाकूने वार केले. हल्ला केल्यावर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर चंद्रशेखर गुरुजी यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्यांचा मृत्यू झाला.









