पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिली माहिती
सातारा
कास पठार भागातील हॉटेलमध्ये बारबाला नाचवणाऱ्या युवकांवर कोंडवे (ता. सातारा) गावच्या हद्दीतील पेट्रोलपंपाजवळ गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी रविवारी सातारा तालुका पोलिसांनी पुण्यातून दोघांना ताब्यात घेतले आहे.
गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात कास येथील जयमल्हार हॉटेलमध्ये बारबाला नाचवल्या गेल्या होत्या. त्यावेळी दोन गटात झालेल्या भांडणात युवकांवर दारूच्या बाटल्या फोडत जीवघेणा हल्ला झाला होता. यातील आरोपींना जामिन मिळाल्यानंतर त्यांना मेढा पोलीस ठाण्यात हजेरीसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये मेढा येथे वादावादी झाली. त्या वादानंतर एकमेकांचा पाठलाग सुरू झाला. यात कोंडवे येथील पेट्रोल पंपानजिक दुचाकीवरील दोघांवर गोळीबार करण्यात आला होता. त्यात दोघे जखमी झाले होते. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. परंतु दोघे अद्याप फरार होते. फरार संशयितांचा तपास पोलीस घेत होते.
रविवारी दोन जण पुण्यात असल्याची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक नींलेश तांबे हे स्वत: पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पुण्याला गेले. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या अटकेची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.








