सीसीबी-माळमारुती पोलिसांची कारवाई : हेरॉईन पुरविणाऱ्या मुंबईच्या ‘अम्मा’वरही एफआयआर
बेळगाव : अमलीपदार्थाविरुद्ध बेळगाव पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली आहे. हेरॉईन व गांजा विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात सीसीबी व माळमारुती पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सीसीबीचे पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्तिक सिद्दाप्पा मल्लाडद (वय 22) रा. शिवाजीनगर याला अटक करून त्याच्याजवळून 16 ग्रॅम 14 मिली हेरॉईन जप्त करण्यात आले. पोलिसांनी 520 रुपये रोख रक्कम, एक आयफोन असे एकूण 90 हजार 520 रु. किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. शिवबसवनगर येथील पीडब्ल्यूडीच्या पडक्या क्वॉर्टर्सजवळ हेरॉईन विक्रीसाठी आलेला असताना अचानक छापा टाकून पोलिसांनी कार्तिकला अटक केली आहे. 16 ग्रॅम 14 मिली इतके हेरॉईन आपण मुंबईतून आणल्याची कबुली कार्तिकने दिली आहे.
त्यामुळे कोळीवाडा मुंबई येथील ‘अम्मा’ या महिलेविरुद्धही माळमारुती पोलीस स्थानकात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा 21 (बी) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मलिकसाब उर्फ मलिकजान मकबुलसाब सनदी (वय 26) रा. हिरेहट्टीहोळी ता. खानापूर या तरुणाला अटक करून त्याच्याजवळून 1 किलो 74 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. मंगळवारी अलारवाड ब्रीजजवळ गांजा विक्रीसाठी आला असता मलिकसाबला अटक करण्यात आली आहे. 1 किलो 74 ग्रॅम गांजा, 800 रु. रोख रक्कम व गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल असा 47 हजार 800 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हिरेहट्टीहोळी येथील नौशाद मेहबूब सनदी याने आपल्याला गांजा पुरविल्याची कबुली मलिकसाबने दिली आहे. त्यामुळे नौशादवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांत 1 लाख 38 हजार 320 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.









