पुणे / वार्ताहर :
गौतमी पाटीलचे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करुन त्यावर तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.
आयुष अमृत कणसे (वय 21, रा. भरतगाववाडी, ता. सातारा) याच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांनी गौतमी पाटीलचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करुन तो इंस्टाग्रामवर व्हायरल केला होता. याप्रकरणी गौतमीने 25 फेब्रुवारीला विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार या आरोपींवर भादवि कलम 354 (क), आयटी ऍक्ट 66 (सी), 66 (ई), 67 (ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान विमानतळ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे सखोल तपास करून गौतमीचे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करणाऱ्या व त्यावरून तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संगिता माळी करत आहेत.








