एक लाखाचा मुद्देमाल जप्त : मार्केट पोलिसांची कारवाई
बेळगाव : समर्थनगर येथे बेकायदा दारू विकणाऱ्या दोघा जणांना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून 750 एमएलच्या 171 बाटल्या गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. समर्थनगर येथील मंदिराजवळ सार्वजनिक ठिकाणी बेकायदा दारूविक्री सुरू असल्याची माहिती मिळताच मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक छापा टाकून दोघा जणांना ताब्यात घेतले. मंजुनाथ मलगौडा गिडगेरी (वय 25) मूळचा राहणार हुदली, सध्या राहणार पाचवा क्रॉस, महाद्वार रोड, यतिराज रामचंद्र परदे (वय 28) राहणार तानाजी गल्ली अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याजवळून 128 लिटर दारू व केए 22 एचएम 9467 क्रमांकाची पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची किंमत एक लाखाच्यावर आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सोमवारी रात्री एका पत्रकाद्वारे या कारवाईची माहिती दिली आहे. या कारवाईत एस. बी. खानापुरे, एल. एस. कडोलकर, नवीनकुमार ए. बी., अशीरअहमद जमादार, सुरेश कांबळे, चिक्कण्णा केरनाईक, महांतेश हारोली, कार्तिक जी. एम. आदींनी भाग घेतला.









