फरार काळात फ्लॅट, आर्थिक पुरवठा केल्याप्रकरणी कारवाई
कोल्हापूर
मोक्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सम्राट कोराणेला मदत करणाऱ्या दोघांना पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. उत्तम आकाराम मोरे (वय 45 रा. वाडीचरण ता. शाहूवाडी), विजेंद्र उर्फ सोन्या विश्वनाथ कोराणे (वय 26 रा. वेताळ तालीम, शिवाजी पेठ) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. उत्तम मोरे याने त्याचा नवी मुंबई येथील फ्लॅट भाड्याने सम्राटला दिला होता. तर या काळात वेळोवेळी सोन्या कोराणे याने सम्राटला पैसे दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मटकाकिंग सम्राट सुभाष कोराणे (रा. वेताळमाळ, तालीमजवळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर) हा मोक्याच्या गुन्ह्यात सुमारे सहा वर्षे फरारी होता. तो 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात स्वत:हून हजर झाला. न्यायालयाच्या आदेशाने अटक केली आहे. तो सध्या पोलीस कोठडीत असून, या गुन्ह्यात तपास शहर पोलीस उपाअधीक्षक अजित टिके करत आहेत. फरार काळात कोराणे हा वाशी (नवीमुंबई) येथील एका अपार्टमेंट मधील प्लॅटमध्ये आश्रयास होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सम्राट तात्काळ मुंबईला पसार झाला. यानंतर कोरोनाकाळात सम्राट तीन वर्षे मुंबई येथे अडकून राहिला होता. या काळात त्याला आर्थिक मदत कोणी केली याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. नवी मुंबई (वाशी) येथील फ्लॅट वाडीचरण येथील उत्तम मोरे याचा असून त्याने तो सम्राटला भाड्याने दिला होता. या प्रकरणी चौकशीअंती उत्तम मोरे याच्यावर गुन्हा दाखल करुन शनिवारी रात्री अटक करण्यात आली. या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या 44 वर पोहोचली असून, अद्यापही पप्पू सावला फरार आहे. त्याच्या अटकेनंतर या प्रकरणातील आणखीन खुलासे होणार आहेत.
धायरी झोपडपट्टीमध्ये वास्तव
मुंबई येथून मटका किंग सम्राट कोराणे याने आपले ठिकाण बदलून पुणे येथील वडगांव धायरी (पुणे) झोपडट्टीमध्ये हलविले. येथील एका अपार्टमेंटमध्ये खॉट बेसिसवर पेयिंग गेस्ट म्हणून राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मटक्यातील सम्राटवर फरार काळात पेयिंग गेस्ट म्हणून राहायची वेळ आल्याचे समोर आले आहे.
पप्पू सावलाकडूनही आर्थिक रसद
फरार काळात सम्राट कोराणे पुणे, मुंबई येथे वास्तव्यास होता हे समोर आले आहे. मात्र या काळात त्याला आर्थिक रसद कोणी पुरविली याचा शोध पोलिस घेत आहेत. त्या काळात पप्पू सावलाकडून आर्थिक रसद पुरविल्याचा संशय पोलिसांना आहे. या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. तसेच स्थानिक काही त्याच्या संपर्कात होते याचाही शोध सुरु आहे.
सोन्याने पैसे दिल्याचा ठपका
विजेंद्र उर्फ सोन्या कोराणे याने सम्राटला पुणे येथे वास्तव्यासाठी वेळोवेळी पैसे पुरवल्याचे समोर आले आहे. सोन्या आठ ते दहा दिवसातून पुणे येथे जावून सम्राटला पैसे देत होता. तसेच सम्राटचे धायरी परिसरात काही मित्र होते. या मित्रांच्या खात्यावरही त्याने पैसे पाठविल्याचे तपासात समोर आले आहे.
Previous Articleकार अपघातात 8 पर्यटक जखमी
Next Article नंदगड यात्रेनिमित्त आज कुस्ती मैदान








