पहलगाम हल्लाप्रकरणी एनआयएची कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन महिन्यांनी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पहलगाममधून दोघांना अटक केली आहे. या दोघांनी हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना आश्रय दिला होता, असे एनआयएच्या तपासात दिसून आले आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर अशी आहेत. चौकशीदरम्यान दोघांनीही दहशतवाद्यांची ओळख उघड केली असून ते पाकिस्तानी नागरिक असल्याचे आणि बंदी घातलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी (एलईटी) संबंधित असल्याचेही स्पष्ट केले आहे.
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 16 जण गंभीर जखमी झाले. दहशतवाद्यांनी त्यांच्या धार्मिक ओळखीच्या आधारे पर्यटकांना निवडकपणे लक्ष्य केले होते. ही घटना पहलगाम शहरापासून 6 किमी अंतरावर असलेल्या ब्यासरण खोऱ्यात घडली होती. पहलगाम खोऱ्यात दहशत माजवण्यापूर्वी हल्लेखोरांनी हिल पार्क येथे असलेल्या तात्पुरत्या ढोक (झोपडी) मध्ये वास्तव्य केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यानुसार आता परवेझ आणि बशीर यांनीच हल्ल्यापूर्वी सदर दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचेही स्पष्ट झाले. परवेझ आणि बशीर यांनी हल्ल्यापूर्वी तिन्ही दहशतवाद्यांना जाणूनबुजून सामावून घेतले होते. त्यांनी त्यांना जेवण आणि इतर सुविधा पुरवल्या होत्या, असेही आतापर्यंतच्या त्यांच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे.
तपासात तीन दहशतवाद्यांची नावे उघड
हल्ल्यानंतर केलेल्या तपासात तीन दहशतवाद्यांची नावे उघड झाली. 24 एप्रिल रोजी अनंतनाग पोलिसांनी तीन रेखाचित्रे जारी केली. त्यात अनंतनागचा आदिल हुसेन ठोकर, हाशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अली उर्फ तल्हा भाई या तीन दहशतवाद्यांची नावे पुढे आली. मुसा आणि अली हे पाकिस्तानी आहेत. मुसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये कमांडो होता. त्याच्यावर प्रत्येकी 20 लाख रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे. एनआयएने अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी या तीन दहशतवाद्यांची नावे उघड केली आहेत. मात्र, इतर काही दहशतवाद्यांची नावे स्पष्ट झालेली नाहीत.
पहलगाम हल्ल्याविरुद्ध भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’
भारताने 6-7 मे रोजी रात्री 1:05 वाजता पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हवाई हल्ले करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला होता. त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. यामध्ये 9 दहशतवादी अ•dयांवर हल्ला केल्यानंतर 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले होते. या हल्ल्यात कुटुंबातील 10 सदस्य आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहरचे 4 सहकारी मारले गेले. भारताने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला चढवत आपली ताकद दाखवून दिली होती.









