पुणे / प्रतिनिधी :
एका व्यावसायिकावर गोळीबार करून त्याची चार लाख रुपयांची रक्कम पळवून नेल्याप्रकरणी पसार झालेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकास यश आले आहे. याप्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींकडून दोन पिस्तूल, 31 काडतुसे व चोरीची साडेतीन लाख रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
अभयकुमार सुबोधकुमार सिंग (वय 23, रा. मार्केटयार्ड, पुणे, मु. रा. बिहार), नितीन कुमार रमाकांत सिंग (वय 22, रा.बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासोबतचा साथीदार मोहम्मद बिलाल शेख (28, रा. मार्केटयार्ड, पुणे) या आरोपीलाही अटक करण्यात आलेली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात आरोपींवर खुनाचा प्रयत्न, आर्मस ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल आहे.
गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक तपास करत असताना त्यांना पाहिजे असलेले आरोपी हे कर्नाटक राज्यातील बेंगळूर याठिकाणी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांचे एक पथक बेंगळूर गेले व त्यांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद केले. आरोपींना पुढील तपासासाठी स्वारगेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.









