ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसामुळे तेथील नद्या, नाल्यांना पूर आला आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचा प्रवाह ओलांडताना लष्कराचे दोन जवान वाहून गेले आहेत. जम्मू-कश्मीरच्या पुंछमध्ये ही दुर्घटना घडली असून, सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाकडून या जवानांसाठी शोधमोहिम सुरू आहे.
वाहून गेलेले दोन्ही जवान शनिवारी पुंछ परिसरात गस्त घालत होते. यावेळी दुथडी भरून वाहणारी नदी ओलांडताना जोरदार प्रवाहाच्या तडाख्यात ते दोघेही वाहून गेले. त्यांच्या शोधासाठी पुंछ जिल्ह्यातील मुगल रोडलगत पोशाना भागात शोधमोहीम सुरू आहे. वाहून गेलेल्या दोन जवानांपैकी एक नायब सुभेदार आहेत. कुलदीप सिंह असं त्यांचं नाव आहे. तर दुसऱ्या जवानाचे नाव समजू शकले नाही. दोघांच्या शोधासाठी बचाव पथक तैनात करण्यात आली आहे. बचाव पथकांना आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी वरिष्ठ लष्कर आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल आहेत.









