शेतकऱ्यात भीतीचे वातावरण
न्हावेली / वार्ताहर
मळेवाड गावात लंपीचा प्रादुर्भाव वाढत असून दोन जनावरे या रोगाने दगावलेली आहेत यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे सद्यस्थितीत सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी लंपी रोगांचे प्रादुर्भाव वाढत असताना दिसत आहे. त्यामुळे अनेक जनावरे लंपीमुळे मृत्युमुखी पडत आहेत.
अशीच घटना मळेवाड माळकरटेंब येथे घडली असून घनश्याम मुळीक यांची एक गाय व एक पाडा लंपीमुळे मृत्यु पावल्याने मुळीक यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. आणखीच काही जनावरांना याचा प्रादुर्भाव होत असून पशू वैद्यकीय अधिकारी उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून येत आहेत. मळेवाड येथील पशुवैद्यकीय अधिकारी टिकटे हे पशु वैद्यकीय सेवा देण्यासाठी गावात उपलब्ध नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत एकीकडे लंपी रोगाने मृत्यूमुखी पडत असलेली जनावरे तर दुसरीकडे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लंपी रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वैद्यकीय सेवा देण्यासाठी होत असलेली टाळाटाळ असे चित्र दिसून येत असून यामुळे शेतकरी वर्गातूनही नाराजी व्यक्त केली जात आहे शेतकऱ्यांच्या जनावरांना लंपीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवा द्यावी अशा सूचना पालकमंत्री रविंद्र चव्हाण व जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी पशू विभागाला तात्काळ द्याव्यात अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.









