तासगाव :
तासगाव तालुक्यातील पाडळी येथे वडिलांच्या बरोबर जनावरे राखण्यासाठी आलेल्या अडीच वर्षीय बालकाचे अज्ञाताकडून अपहरण झाले असावे असा संशय वडिलांनी व्यक्त केला. याप्रकरणी वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तिविरूध्द तासगांव पोलीसात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली. तर तासगांव पोलिसांनी रविवारी तब्बल नऊ तास बालकाचा शोध घेतला पण मिळून आले नाही. सोमवारी ड्रोनव्दारे शोध घेतला जाणार आहे.
तालुक्यातील पाडळी येथील शंभुराज शशिकांत पाटील वय अडीच वर्षे असे त्या बालकाचे नाव आहे. तर याप्रकरणी त्याचे वडिल शशिकांत रावसाहेब पाटील रा. धामणी सध्या रा. पाडळी यांनी अज्ञात व्यक्ति विरूध्द फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे शनिवार ५ जुलै रोजी सकाळी १० चे दरम्यान बामणी ता. खानापूर येथे दुध डेअरीला दुध घालणेसाठी गेले होते. बामणी ही त्यांची सासरवाडी असून मुलगा शंभुराज गेले आठ दिवसापुर्वी सासरे यांचेकडे राहणेस गेला होता. दुध घालून फिर्यादी त्यास सोबत घेवून पाडळी येथे ११ च्या दरम्यान घरी आले. फिर्यादी व त्यांच्या भावाची मुले घराजवळ पाण्यात खेळत होती. म्हणून फिर्यादी यांनी त्यांना घरी आणले. त्यानंतर शंभुराज हा परत ओढयातील पाण्यात खेळण्यासाठी जाईल म्हणून फिर्यादी दुपारी शंभुराज यास सोबत घेवून शेतातील जनावराकडे गेले. त्यावेळी घरी आत्या एकटीच होत्या. तर पत्नी गवत आणणेकरिता शेतात गेल्या होत्या. वडिल शेळ्या चारण्यासाठी घेवुन गेले होते.
फिर्यादी व मुलगा शंभुराज दिवसभर जनावरांचे बरोबर सोबत होते. सायंकाळी ४.१५ च्या दरम्यान फिर्यादी यांचे ओळखीचे विश्वास पाटील, चेंड्या भाऊ हे फिर्यादी यांचे जवळ आलेने फिर्यादी त्यांचे बरोबर बोलत थांबले होते. ते दोघे निघून गेल्यानंतर सायंकाळी ४.३० च्या दरम्यान फिर्यादी चरण पाटील रा. पाडळी यांचे शेतात बांधलेली जनावरे सोडून त्यांच्या दुसऱ्या दुकड्यात बांधण्यासाठी गेले. त्यावेळी शंभुराज झाडाखाली खेळत होता. जनावरे बांधून झालेनंतर फिर्यादी अंदाजे ५ च्या दरम्यान फिर्यादी यांनी शंभुराज खेळत असल्या ठिकाणी येऊन पाहिले असता तो दिसला नाही. फिर्यादी यांनी त्याचा शेतात व आजू बाजूच्या परिसरामध्ये शोध घेतला असता तो मिळून आला नाही. फिर्यादी यांनी लगेच घरी जावुन पत्नी व भावजय यांना शंभुराज हा घरी आला आहे काय असे विचारले असता त्यांनी तो घरी आला नाही असे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी शंभुराज याचा शेतात व गावात मळ्यातील वरतीवर जावून शोध घेतला, चौकशी केली. परंतु शंभुराजची माहिती मिळाली नाही.
दरम्यान रात्री ११२ वर कॉल करून मुलगा शंभुराज हा सापडत नसले बाबत कळवले. तसेच तासगांव पोलिसांनीही येवून शोध घेतला असता तो मिळून न आल्याने त्याला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेले असाव अशी माझी खात्री झाल्याची फिर्याद देण्यात आली.
- पोलीस पथक दाखलः नऊ तास शोध आज ड्रोन कॅमेराव्दारे शोध
घटनेचे वृत्त समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, निरीक्षक सोमनाथ वाघ, उपनिरीक्षक अविनाश घोरपडे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने पाडळी, धामणी परिसरात सकाळी १० ते सायंकाळी ७ शोध घेतला, श्वान पथकानेही शोध घेतला पण तो मिळुन आला नाही. सोमवारी ड्रोनव्दारे विहिरी तसेच या परिसरातील पाण्याचा स्रोत असलेल्या ठिकाणी शोध घेण्यात येणार असल्याचे पो.नि. सोमनाथ वाघ यांनी सांगितले. शंभुराज पाटील हा वडिलांबरोबर जनावरे राखण्यासाठी आला असता. वडिल जनावरे हाकलण्यासाठी थोड्या अंतरावर दूर गेल्यानंतर अचानक बेपत्ता झालेला आहे. तरी त्याचा शोध व्हावा. हे बालक मिळून आल्यास तसेच त्याच्याविषयी माहिती मिळाल्यास तासगांव पोलीस ठाणे ०२३४६ २४०१०० या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी केले आहे.








