संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून फुटेज ताब्यात : बाजारपेठेत खळबळ
बेळगाव : रविवारपेठ येथील सुकामेवा व मसाल्याच्या दुकानात चोरी झाली आहे. खरेदीच्या बहाण्याने दुकानात आलेल्या दोघा जणांनी अडीच लाख रुपये रोकड असलेली बॅग हातोहात पळविली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी ते फुटेज ताब्यात घेतले आहे. बुधवार दि. 27 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते 2.30 या अर्ध्या तासाच्या कालावधीत ही घटना घडली आहे. रविवारपेठ येथील अय्यप्पा ट्रेडर्सचे संचालक पवन गौडा यांनी गुरुवारी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी फुटेज ताब्यात घेतले असून खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरलेल्या दोघा जणांनी अत्यंत सफाईदारपणे गल्ल्याजवळच ठेवलेली अडीच लाख रुपये असलेली पिशवी पळविली आहे.
पैसे पळविणारा अल्पवयीन असून त्याच्यासोबत मदतीला एक तरुणही होता. पैशाची बॅग हातात घेतल्यानंतर दोघा जणांनीही घाईघाईने दुकानातून काढता पाय घेतला आहे. गल्ल्यावर बसलेल्यांची थोडीशीही नजर या प्रकाराकडे गेली नाही. एका पिशवीत अडीच लाख रुपये घालून ती खाली ठेवण्यात आली होती. तब्बल पंधरा मिनिटांहून अधिककाळ गल्ल्याजवळ थांबून अल्पवयीन मुलाने पैशाची पिशवी पळविली आहे. बाजारपेठेत सुकामेवा दुकानदार, कापड दुकानदारांचे लक्ष विचलित करून गल्ल्यातील पैसे, किमती साड्या लांबविल्याच्या घटना घडल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी देशपांडे गल्ली येथील सुकामेव्याच्या दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करून गल्ल्यातील 50 हजार रुपये रोकड पळविल्याच्या आरोपावरून इराणमधील चौघा जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर लगेच खडेबाजार येथील कापड दुकानातून किमती रेशमी साड्या पळविणाऱ्या आंध्रप्रदेशमधील सात जणांच्या टोळीला अटक करण्यात आली होती. रविवारपेठ येथे घडलेल्या घटनेने व्यापाऱ्यांत खळबळ माजली आहे.









