कडीकोयंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड लांबविली
प्रतिनिधी /बेळगाव
रामतीर्थनगर येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड पळविली आहे. शनिवारी सकाळी चोरीची ही घटना उघडकीस आली असून सोमवार दि. 4 जुलै रोजी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सुनीता सतीश रन्नोरे यांचा रामतीर्थनगर येथील शिवदीप हा बंगला फोडण्यात आला आहे. 30 जून रोजी दुपारी आपल्या घराला कुलूप लावून सुनीता व त्यांचे कुटुंबीय देवदर्शनासाठी धर्मस्थळला गेले होते. 2 जुलै रोजी शेजाऱयांनी त्यांच्याशी संपर्क साधून घरात चोरी झाल्याचे सांगितले.
चोरटय़ांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला आहे. तिजोरीतील सुमारे 2 लाख 2 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 3 हजार 700 रुपये किमतीचे चांदीचे दागिने व 25 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 2 लाख 31 हजार 200 रुपये किमतीचा ऐवज लांबविला आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. बी. कुंडेद व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.









