लाखो रुपयांचे नुकसान : भरपाई देण्याची मागणी
सांबरा : सांबरा येथे सुमारे दोन एकरमधील ऊस शॉर्टसर्किटमुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, येथील शेतकरी सुनील देसाई व धनंजय देसाई यांच्या उसाच्या फडाला दुपारी तीनच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची घटना पाहताच शिवारात असलेले ता. पं. माजी सदस्य काशिनाथ धर्माजी, विष्णू जाधवसह आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी आग आटोक्यात न आल्याने बेळगाव येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळी येऊन शर्थिचे प्रयत्न करून विझवली. मात्र तोपर्यंत सुमारे दोन एकरातील ऊस जळून खाक झाला होता. या घटनेमुळे देसाई बंधूंचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी देसाई कुटुंबीयांनी मागणी केली आहे.









