म्हसवड :
म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील पानवण (ता. माण) येथील महेश बबलू चव्हाण व रंगनाथ मुरलीधर चव्हाण या दोघांवर सहा वर्षांपूर्वी चोरीचा गुन्हा दाखल होता. मात्र सहा वर्षे दोघेही फरारी होते. तेव्हापासून त्यांची शोधमोहीम सुरू होती. अनेक वेळा पोलिसांना गुंगारा देत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरारी होत होते. गोपनीय खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पानवण येथील चव्हाणवस्ती येथील येथील महेश व रंगनाथ दोघे राहत असलेल्या घराला शुक्रवारी मध्यरात्री साध्या वेशातील पोलिसांनी वेढा टाकून दोघांना सिनेस्टाईलने अटक केली. याबद्दल सहाय्यक निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या टीमचे वरिष्ठांनी अभिनंदन केले.
याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन २०१९ मध्ये चोरी प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात महेश बबलू चव्हाण आणि रंगनाथ मुरलीधर चव्हाण (रा. चव्हाणवाडी, पानवण, ता. माण) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल आहे. सदरचे दोन्ही संशयित आरोपी २०१९ पासून न्यायालयात या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी हजर न राहता तब्बल सहा वर्षे अजामीनपात्र वॉरंट निघून सुद्धा मिळून येत नव्हते. अनेकवेळा पोलीस घरी गेले होते. मात्र दोघे मिळून आले नव्हते.
तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच गोपनीय यंत्रणा सतर्क करून माहिती घेऊन ते राहत असलेल्या पानवणनजीक असलेल्या चव्हाण वस्तीवरील घराला साध्या वेशातील पोलिसांनी मध्यरात्री वेढा टाकला. संशयितांना शिताफीने अटक करून पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या धाडसी कामगिरीचे कौतुक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी करून अभिनंदन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस हवालदार भगवान सजगणे, नीता पळे, योगेश सूर्यवंशी, अभिजीत भादुले, युवराज खाडे यांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले








