8 डॉलर्सच्या सब्सक्रिप्शनसोबत मिळणार नवी फीचर्स
वृत्तसंस्था / सॅन फ्रान्सिस्को
टेस्लाचे सीईओ आणि ट्विटरचे नवे मालक एलन मस्क यांच्या 8 डॉलर्सच्या प्लॅनची सुरुवात झाली आहे. ऍपल कंपनीने स्वतःच्या ग्राहकांना ट्विटरच्या या नव्या निर्णयाची माहिती देण्यास प्रारंभ केला आहे. ऍपलच्या ऍप स्टोअरवर ट्विटर ऍप डाउनलोड करताना ट्विटर ब्ल्यू सेवेसाठी 7.99 डॉलर्स प्रतिमहिन्याला खर्च करावे लागणार असल्याचा संदेश मिळत आहे. ट्विटरची ब्ल्यू सेवा सध्या केवळ अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये उपलब्ध आहे.
ट्विटर ब्ल्यूमध्ये आम्ही नव्या सुविधा जोडत आहोत आणि लवकरच आणखी सुविधांचा समावेश होणार आहे. तुमच्या अकौंटला लोकप्रिय व्यक्ती, कंपन्या आणि राजकीय नेत्यांप्रमाणेच ब्ल्यू टिक मिळणार असल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले.
ट्विटर ब्ल्यूच्या ग्राहकांना कमी जाहिराती दिसणार आहेत, तसेच या ग्राहकांना दीर्घ कालावधीचे व्हिडिओ पोस्ट करता येतील. गुणवत्ता कंटेंटसाठी या ग्राहकांना प्राथमिकता मानांकन प्राप्त करता येणार आहे.
कंपनीकडून करण्यात आलेला हा बदल वर्तमान व्हेरिफिकेशन सिस्टीमला समाप्त करणार आहे. ही सिस्टीम 2009 मध्ये प्रसिद्ध व्यक्ती तसेच राजकीय नेत्यांसारख्या हाय-प्रोफाइल अकौंट्सचे डुप्लिकेशन रोखण्यासाठी सादर करण्यात आली होती. ट्विटरकडे आता सुमारे 4 लाख 23 हजार व्हेरिफाइड अकौंट्स आहेत. ट्विटरवर सर्व लोकांचे व्हेरिफिकेशन (पडताळणी) करू इच्छितो असे एलन मस्क यांनी म्हटले होते. सार्वजनिक आकडेवारीची ओळख ब्ल्यू चेकसह अन्य पद्धतींद्वारे केली जाणार आहे.
ट्विटरमध्ये कर्मचारीकपात
एलन मस्क यांनी ट्विटरवर मोठय़ा प्रमाणावर कर्मचारीकपात सुरू केली आहे. ट्विटरचे सह-संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी यासाठी स्वतःला जबाबदार मानले आहे. या स्थितीसाठी मी जबाबदार आहे. कंपनीचा आकार मी अत्यंत वेगाने वाढविला होता असे डोर्सी यांनी म्हटले आहे.
अन्य पर्याय नव्हता
कर्मचारी कपात करण्याशिवाय कंपनीकडे अन्य कुठलाच पर्याय नव्हता. कंपनीला दरदिनी 4 दशलक्ष डॉलर्सहून अधिकचे नुकसान होत आहे. ज्या कर्मचाऱयांना नोकरी गमवावी लागली आहे, त्यांना तीन महिन्यांचे वेतन देण्यात आल्याचे मस्क यांनी नमूद केले होते.









