एलॉन मस्क यांच्याकडून घोषणा
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक स्तरावरील प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या अधिकृत खात्याचा लोगो बदलला असून आता ‘एक्स’ हा नवा लोगो यापुढे असणार आहे.
याआधी ट्विटरच्या लोगोवर निळा पक्षी होता. तो आता बदलण्यात आला आहे. ट्विटरचे नवे नाव आता ‘एक्स’ असणार असून एक्सडॉटकॉमवर (X.com) गेल्यावर आपण ट्विटरवर पोहोचणार असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. यासंदर्भात मस्क यांनी एक व्हिडिओ सादर केला असून त्यात नवा ‘एक्स’ हा लोगो असल्याचे स्पष्ट केले आहे. मस्क यांनी आपला प्रोफाईल पिकही बदलून ‘एक्स’ ठेवला आहे. ‘एक्स’ हे असे प्लॅटफॉर्म असणार आहे ज्यावर पेमेंट, बँकिंग आणि इ-कॉमर्ससारख्या सेवांशी संपर्क साधण्याची व्यवस्था असणार असल्याचे सांगितले जाते.
1999 पासून मस्क यांचे ‘एक्स’शी नाते
एलॉन मस्क यांचे ‘एक्स’ या अक्षराशी 1999 पासूनच नाते बनलेले आहे. त्यावेळी त्यांनी एक ऑनलाईन बँकिंग कंपनी एक्सडॉटकॉम बनवली होती. ही नंतर अन्य एका कंपनीत विलीन झाली जी पेपाल म्हणून ओळखली गेली. 2017 मध्ये मस्क यांनी पेपालकडून युआरएल एक्सडॉटकॉमला पुन्हा खरेदी केले होते.