एकाचवेळी दोघींनी दिला पतींना घटस्फोट
रोजी अन् कॅथी या जुळ्या बहिणी असून त्यांच्या चेहऱ्यात बऱ्यापैकी साम्य आहे. मागील 23 वर्षांपासून दरदिनी या दोन्ही बहिणी एकसारखे कपडे घालत आहेत. त्यांचे मॅचिंग आयटम केवळ कपड्यांपुरती मर्यादित राहिले नसून त्यांचे घर देखील एकसारखेच दिसते. या दोघींनी परस्परांच्या शेजारीच घर तयार केले आहे. रोजी अन् कॅथी यांच्या घरांचा लेआउट देखील एकसारखाच आहे. जेव्हा दोघी घराबाहेर पडतात, तेव्हा एकसारखे मॅचिंग कपडे परिधान करतात. रोजी कोल्स आणि कॅथी हेफर्नन या दोघींचे वय सध्या 69 वर्षे आहे. त्यांना एकसारखे कपडे परिधान करणे पसंत असून त्या दीर्घकाळापासून असे करत आहेत. त्यांच्याकडे चष्मे आणि पादत्राणांच्या एकसारख्या अनेक जोड्या आहेत. या दोघी एकत्र बाहेर फिरण्याचा आणि शॉपिंगचा आनंद घेतात. तसेच या दोघींनी स्वत:च्या क्लीनिंग बिझनेसमध्ये 11 वर्षांपर्यंत एकत्र काम केले आहे.

कपड्यांनी भरलेले कपाट
दोन्ही महिला 50 च्या दशकातील कपड्यांच्या शौकीन आहेत आणि त्यांना 50 च्या दशकातील स्टाइलचा पेहराव पसंत आहे. आमच्याकडे अनेक कपडे आहेत, जेव्हा आम्ही दुकानात जातो आणि स्वत:च्या पसंतीची एखादी गोष्ट पाहतो, तेव्हा त्याचे दोन नग खरेदी करतो. आम्हा दोघींचे कपाट एकसारख्या कपड्यांनी भरून गेले असल्याचे रोजी सांगते.
आम्ही एकसारखेच कपडे परिधान करत असल्याने लोकांना आमची ओळख पटविणे जड जाते. परंतु आमच्या लुकबद्दल होणारे कौतुक आम्हाला आवडते. लोक आम्हाला पाहून एक छायाचित्र काढून घेण्याची विनंती करतात, असे कॅथी यांनी सांगितले आहे. अनेकदा जुळ्या मुलांना दीर्घकाळानंतर एकत्र पाहिले जात नाही. परंतु आम्हा दोघींचा चष्मा देखील एकसारखाच आहे. तसेच आमची केसरचना देखील एकसारखीच असते. मागील 23 वर्षांपासून आम्ही बहुतांश दिवस एकत्रच राहतो असे कॅथी यांनी म्हटले आहे.
2000 साली विभक्त
आम्ही एकसारखेच कपडे परिधान करून लहानाच्या मोठ्या झालो. परंतु विवाह अन् मुले झाल्यामुळे आमच्या जीवनात अंतर येऊ लागल्यावर एकसारखे कपडे परिधान करणे बंद केले होते असे या बहिणींनी सांगितले. कॅथी आणि रोजी यांनी 2000 साली स्वत:च्या पतींकडून घटस्फोट घेतला होता. तेव्हापासून या दोघी परस्परांच्या जवळ राहत आहेत. तसेच त्यांनी आता एकसारखेच कपडे परिधान करणे पुन्हा सुरू केले आहे. दोन्ही बहिणींनी मे महिन्यात फ्रान्स अन् स्पेन या देशांमध्ये भ्रमंती केली होती.









