मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा विश्वास ः देशाला संबोधून भाषण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी सायंकाळी देशाला उद्देशून आपल्या कारकिर्दीतील अखेरचे संबोधन केले. त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळाचा रविवारी शेवटचा दिवस होता. याप्रसंगी त्यांनी आपल्या भाषणात समाजातील सर्व स्तरातून पाठिंबा मिळाल्याबद्दल समाधानाची भावना व्यक्त केली. तसेच भारताच्या लोकशाहीची ताकद मोठी असून चैतन्यशील लोकशाही व्यवस्थेच्या शक्तीला मी सलाम करतो असे सांगत आपला देश एकविसाव्या शतकाला भारताचे शतक बनविण्यास सक्षम असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारतीय संस्कृतीची एक स्वतंत्र ओळख आहे. आपल्या मुळाशी जोडलेले राहणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय़ आहे. आताही भारताची वाटचाल सुकरपणे सुरू असून पुढील भविष्यकाळ आपलाच असेल, असे राष्ट्रपती म्हणाले. हवामान बदलाचे संकट आपल्या भविष्यासाठी एक गंभीर धोका आहे. आपल्या मुलांसाठी आपले पर्यावरण, आपली जमीन, हवा आणि पाणी यांचे रक्षण करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रनिर्मात्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची गरज
आपल्या पूर्वजांनी आणि आधुनिक राष्ट्रनिर्मात्यांनी आपल्या कठोर परिश्रम आणि सेवाभावनेतून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे आदर्श आत्मसात केले. आपण फक्त त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जात राहायचे आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रपतींच्या कार्यकाळात माझ्या मूळ गावाला भेट देणे आणि कानपूरच्या माझ्या शाळेतील वृद्ध शिक्षकांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या चरणांना स्पर्श करणे हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असल्याची आठवणही त्यांनी सांगितली. अनेक देशवासीयांना भेटल्यानंतर माझा विश्वास दृढ झाला की आपले लोकच खरे राष्ट्रनिर्माते आहेत. अशा महान देशवासियांच्या हातात आपले भविष्य सुरक्षित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशवासियांचे मनःपूर्वक आभार
पाच वर्षांच्या कार्यकाळात मी माझ्या क्षमतेनुसार माझी कर्तव्ये पार पाडली आहेत. मी डॉ. राजेंद्रप्रसाद, डॉ. एस. राधाकृष्णन आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे महान व्यक्तिमत्त्वांचे उत्तराधिकारी म्हणून अत्यंत जागरुक राहिलो, असेही ते म्हणाले. अखेरीस सर्व देशवासियांचे मनापासून आभार व्यक्त करत भारतमातेला वंदन करताना मी तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो, असे राष्ट्रपती कोविंद म्हणाले. तसेच आपल्या भाषणात राष्ट्रपती म्हणून नव्याने निवडून आलेल्या द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले. सोमवारी त्या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत.
राजघाटावर अभिवादन
आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्यादिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद महात्मा गांधींचे स्मारक असलेल्या राजघाटावर पोहोचले. त्यांनी येथे राष्ट्रपिता यांना आदरांजली वाहिली. तत्पूर्वी शनिवारी त्यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये खासदारांना संबोधित केले. निरोप समारंभात कोविंद यांनी सर्व पक्षांना पक्षीय राजकारणापासून वर उठून देशहितासाठी काम करण्याचा सल्ला दिला होता. संसदेतील हय़ा सेंट्रल हॉलमध्ये निरोप घेणारे कोविंद हे शेवटचे राष्ट्रपती ठरले आहेत. कोविंद यांच्यासोबतच हे संसद भवनही निरोप घेत आहे. संसद भवनच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण होणार असून नवीन इमारतीतच संसदेचे कामकाज होणार आहे.









