143 महिला खासदार-आमदारांवर गंभीर प्रकरणे, एडीआरच्या नव्या अहवालात खळबळजनक माहिती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
असोसिएशन फॉर डेमॉव्रेटिक रिफॉर्म (एडीआर) च्या नव्या अहवालानुसार कलंकित महिला लोकप्रतिनिंची संख्याही कमी नसल्याचे दिसून आले आहे. देशातील 143 महिला खासदार आणि आमदारांपैकी 28 टक्के लोकप्रतिनिधींवर गुन्हे नोंद आहेत. 78 महिला लोकप्रतिनिधींच्यावर हत्या आणि अपहरण यांच्यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत, अशी माहिती या अहवालात आहे. देशभरात एकंदर 500 च्या आसपास महिला लोकप्रनिनिधी आहेत. त्यांच्यापैकी 75 महिला लोकसभेच्या खासदार आहेत. तर राज्यसभेत 37 महिला खासदार आहेत. लोकसभेच्या 75 महिला खासदारांपैकी सहा महिला शतकोट्याधीश आहेत. तर राज्यसभेच्या 37 महिला खासदारांपैकी 3 शतकोट्याधीश आहेत, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. देशात एकंदर 512 महिला खासदार किंवा आमदार आहेत. त्यांच्यापैकी 143 जणींवर गुन्हे नोंद आहेत.
17 शतकोट्याधीश
खासदार आणि आमदार असलेल्या महिलांपैकी 17 जणींची संपत्ती प्रत्येकी 100 कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यांच्यात लोकसभेच्या 6 खासदार, राज्यसभेच्या 3 खासदार आणि विधानसभांमधील 8 आमदार महिलांचा समावेश आहे. 512 महिला लोकप्रतिनिधींची एकंदर संपत्ती 10 हजार 417 कोटी रुपये इतकी आहे.
शिक्षण किती…
भारतातील 512 लोकप्रतिनिधी महिलांपैकी 71 टक्के महिला पदवीधर किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्या आहेत. 24 टक्के महिला 5 वी ते बारावी पर्यंत शिकलेल्या आहेत. तर 12 महिलांनी पदविकेपर्यंतचे (डिप्लोमा) शिक्षण घेतले आहे. या संदर्भात त्यांची कामागिरी पुरुष लोकप्रनिधिंसारखीच असल्याचे दिसते.
कलंकितांची संख्या चिंताजनक
देशातील 28 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेश यांच्यात मिळून 4 हजार 123 विधानसभा सदस्य आहेत. त्यांच्यापैकी तब्बल 45 टक्के विधानसभा सदस्यांवर गुन्हे नोंद आहेत. आंध्र प्रदेशात 174 विधानसभा सदस्यांपैकी 138 सदस्यांवर गुन्हे नोंद आहेत. तर सिक्कीम विधानसभेतील 32 सदस्यांपैकी केवळ एकावर गुन्हे नोंद आहेत. आंध्र प्रदेशच्या तेलगु देशम पक्षाच्या 134 विधानसभा सदस्यांपैकी 115 जणांच्या वर गुन्हे नोंद आहेत, अशी माहिती दिली.
चंद्राबाबू नायडू सर्वात श्रीमंत
देशभरातील मुख्यमंत्र्यांमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे सर्वात श्रीमंत असून त्यांची संपत्ती 931 कोटी रुपयांची आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची संपत्ती केवळ 15 लाख रुपये असून त्या सर्वात कमी श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. भारतातील प्रत्येक व्यक्तीचे सरासरी उत्पन्न 1 लाख 85 हजार रुपये आहे. तर प्रत्येक मुख्यमंत्र्याचे सरासरी उत्पन्न वार्षिक 13 लाख 64 हजार रुपये आहे, अशीही माहिती अहवालात देण्यात आली आहे. पैशाच्या संदर्भात पुरुष लोकप्रतिनिधी महिला लोकप्रतिनिधींच्या तुलनेत पुढे आहेत.
कोणत्या पक्षाचे किती प्रमाण
गुन्हे नोंद असलेल्या महिला लोकप्रतिनिधींमध्ये भारतीय जनता पक्षाच्या 217 पैकी 23 टक्क्यांवर गुन्हे नोंद असून 11 टक्क्यांवर गंभीर गुन्हे नोंद आहे. हे 11 टक्के या 23 टक्क्यांमधीलच आहेत. काँग्रेसच्या 83 महिला लोकप्रतिनिधींपैकी 34 टक्क्यांवर गुन्हे नोंद आहेत तर 20 टक्के महिला प्रतिनिधींवर गंभीर गुन्हे नोंद आहेत. यासंदर्भात भारतीय जनता पक्षावर काँग्रेसने कुरघोडी केलेली आहे. तेलगु देशमच्या 20 महिला लोकप्रतिनिधींपैकी 65 टक्क्यांवर गुन्हे नोंद असून 45 टक्के महिला लोकप्रतिनिधींवर गंभीर गुन्हे नोंद आहेत. साधनशुचितेवर भर देणारा आम आदमी पक्षही या संदर्भात मागे नाही. या पक्षाच्या महिला लोकप्रतिनिधींची संख्या देशभरात 13 इतकी आहे. त्यांच्यापैकी 69 टक्के महिलांवर गुन्हे नोंद आहेत. तर 31 टक्के महिलांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत.









