महाराष्ट्राच्या राजकारणातील विद्यमान घडामोडी पाहिल्या की सर्वसामान्य माणसाची मती गूंग होऊन जाते, किंचित जाणकारांना भ्रमल्यासारखे वाटते आणि तज्ञांची भंबेरी उडते. राज्यात पुढे काय होईल, ते खात्रीलायकरित्या कोणताही राजकीय भाष्यकार सांगू शकणार नाही असा गुंता वाढत आहे. सत्ताधारी कोण, विरोधक कोण, सत्तेला पाठिंबा देणारे कोण आणि विरोधातून सत्तेत सहभागी होणारे कोण, याची उत्तरे देईपर्यंत परिस्थिती बदलत आहे. आदल्यादिवशी शिवसेनेच्या बाजूने बोलणारे सदा सरवणकर दुसऱया दिवशी गुवाहाटीच्या कँपमध्ये जातात, तीच गोष्ट मंत्री उदय सामंतांची. ‘आज इकडे, उद्या तिकडे, सब घोडे बारा टक्के,’ अशी स्थिती आहे. कवी विंदा करंदीकर यांची याच शीर्षकाची कविता आहे. कालपर्यंत आपल्या मांडीला मांडी लावून बसलेल्या आपल्याच सहकाऱयांना ‘घाण’, ‘मृतदेह’ आणि आणखी तशाच विशेषणांचे लेपन केले जात आहे. एकेकाळी उत्तरप्रदेश आणि बिहारमधील राजकीय दंडेलशाहीबद्दल, विरोधी पक्षातील व्यक्तीशी असलेल्या शत्रूत्वाबद्दल बोलले जात असे. महाराष्ट्राने त्याच्या पुढची पायरी गाठत स्वपक्षीयांनाच झोडपून काढत बरबरटलेले नेमके कोण आहेत ते सिद्ध केले आहे. सगळय़ांच्या तोंडी ‘सत्ता काय, आज आहे, उद्या नाही’ अशी भाषा आणि वर्तन मात्र सत्तेसाठी वाट्टेल त्या थराला पोचण्याचे ! अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या कट्टर विरोधकांशी हातमिळवणी केली, तिथूनच ‘सब घोडे बारा टक्के’चा अध्याय सुरू झाला. सत्तेसाठी ऐनवेळी टोपी कशी फिरवायची, मित्रांना शत्रू आणि शत्रूंना मित्र कसे करायचे याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. मग तो कित्ता त्यांच्याच ‘चेल्यां’नी गिरवला तर वाईट का वाटावे? भावनिक आवाहन करून सर्वसामान्य शिवसैनिकांना रस्त्यावर उतरायला लावून तोडफोड आणि गोंधळाला प्रोत्साहन दिले जात आहे. आपण राज्य करीत असलेल्या राज्यात शांतता व सुव्यवस्था राखायला हवी, पण इथे उलटेच होत आहे. आपल्याच बंडखोर सहकाऱयांची कार्यालये, ऑफिसेस फोडली जात आहेत. कार्यकर्त्यांना भडकावले जात आहे. हे सगळे भेदक आहे. वरवर नम्रतेचा आव आणणाऱया राजकारण्यांच्या मुखवटय़ाआडचा चेहरा उजागर करणारे आहे. सत्तेच्या अडीच वर्षांत कोणी किती भ्रष्टाचार केला, त्याची यादी शिवसेनेचेच प्रवक्ते सांगत आहेत. हे या तथाकथित कर्त्याधर्त्यांना ठाऊक होते तर त्यांनी वेळीच अटकाव का केला नाही? आता सगळय़ांचीच पोलखोल होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सत्ता मिळाली तरी कोणतेही पद स्वीकारले नव्हते, सत्ताबाह्य शक्तीकेंद्र म्हणून आपला वरचष्मा ठेवला होता. शिवसेनेच्या विद्यमान पदाधिकाऱयांना बाळासाहेब समजलेच नाहीत, असे म्हणावे लागेल. मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता अनेक वर्षांपासून आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून तिची ओळख आहे. येत्या काळात तिथेही सत्तांतर होऊ शकते आणि आजवर कमावलेल्या इभ्रतीचा पंचनामा होऊ शकतो, याची कुणकुण शिवसेनेतील ज्ये÷ांना लागली आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर व्हावे लागले तर मुंबई महापालिकेच्या सत्तेपासूनही ते लांब जाऊ शकतात. भाजपने आपल्याशी कपट केले आणि युतीची 25 वर्षे सडवत ठेवले, ही उपरती शिवसेना नेत्यांना कुणामुळे झाली? शरद पवार यांनीच उद्धव यांना मुख्यमंत्रीपद ‘आता नाही, तर कधीच नाही’ हे पटवून दिले. ठाकरे यांना त्याचा मथितार्थ समजला नाही. पुढच्या काळात राजकीय घडामोडींना वेग येईल. न्यायालयीन पातळीवर लढाई सुरू राहिलच, रस्त्यावर आणि विधानसभेतही ती होत राहील. गुवाहाटीचे बंडखोर मुंबईत येतील. पण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सगळे प्रकरण जसे हाताळत आहेत, ती आक्रमकता चुकीची आहे. पवार यांचे सत्शिष्य म्हणवून घेताना त्यांचा संयम आणि विरोधकांना शांतपणे नामोहरम करण्याची वृत्ती त्यांनी अंगिकारली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधात बसण्याचा जनतेचा कौल असताना सत्तेची फळ चाखायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचीच राजनीती अवलंबत देवेंद्र फडणवीस भाजपला मोठे करीत आहेत. निवडून येण्याची खात्री असलेले नेते गोळा करून सत्ता काबीज करण्याची पवार यांची शैली तेही अंगिकारत आहेत. त्यामुळेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस हे सगळे सारखेच आहेत. ‘सब घोडे बारा टक्के’ असे जे म्हटले आहे ते यामुळेच. केंद्रातील महाशक्ती देवेंद्र यांना बळ देणारी आहे. अमित शहा यांच्यासारखा धूर्त नेता त्यांच्या पाठीशी आहे. प्रश्न आहे तो बंडखोर आमदारांचा. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी गुवाहाटीतील झाडी, डोंगर आणि हॉटेल अनुभवल्यानंतर आश्चर्य व्यक्त करणारा व्हिडिओ राज्यभर ‘व्हायरल’ झाला आहे. सांगोला हा कायम दुष्काळी तालुका आहे. तिथे झाडी नाहीत आणि डोंगरही. त्यामुळे त्याचे अप्रूप पाटील यांना वाटले, वास्तविक त्याचे वैषम्य आणि लाज वाटायला हवी होती. आपला मतदारसंघ आणि तिथले लोक वर्षानुवर्षे विकासासाठी आसुसलेले आहेत, त्यासाठी काही करण्याची इच्छा सगळय़ा बंडखोरांसह तमाम लोकप्रतिनिधींना असायला हवी. पण सत्तेचा हपापा त्यांना कोणतीही कृती करायला भाग पाडत आहे. महाराष्ट्रातील सत्ताधाऱयांची जी वाईट अवस्था आज झाली आहे, त्याला जबाबदार तेच आहेत, पण सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ बसत आहे. विकासाची कोणतीही कामे होत नाहीत. लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. रोजचा दिवस कसाबसा पुढे ढकलण्यावाचून सामान्य माणूस काही करू शकत नाही. ही कुतरओढ, हे दैन्य आणि ही हतबलता जनसामान्यांच्या ठायी आली आहे. सामान्य मतदारांचा आवाज सत्तेसाठीच्या लढाईत कोण ऐकणार, हा प्रश्न आहे उत्तर नसलेला !
Previous Articleतिरंगी टी-20 मालिकेची पाककडून घोषणा
Next Article क्लिफोर्ड मिरांडा ओडिशा संघाचे सहाय्यक प्रशिक्षक
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.