77.14 टक्क्यांसह मंगळूर जिल्हा राज्यात प्रथम तर चित्रदुर्ग 56.80 टक्के निकालासह शेवटच्या स्थानी
प्रतिनिधी/ बेंगळूर
प्रतीक्षा, हुरहुर आणि कुतूहल असलेल्या 12 परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. राज्यभरातून परीक्षेला बसलेले 61.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात नेहमीप्रमाणे मुलीनींच बाजी मारली आहे. यंदा परीक्षेला 6,83,563 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 4,22,966 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हानिहाय निकालात 77.14 टक्क्यांसह मंगळूर जिल्हा अग्रस्थानी आहे. तर चित्रदुर्ग जिल्हा 56.80 टक्के निकालासह शेवटच्या स्थानावर आहे. बेंगळूरच्या आर. व्ही. पदवीपूर्व महाविद्यालयाची विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी सीमरन शेषाराव 600 पैकी 598 गुण मिळवत राज्यात प्रथम आली आहे.
बेंगळूरच्या पदवीपूर्व परीक्षा मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेमध्ये प्राथमिक-माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. दरवर्षीप्रमाणे विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक लागला आहे. या शाखेचा निकाल 72.53 टक्के, वाणिज्य शाखेचा 64.97 टक्के आणि कला शाखेचा निकाल 48.71 टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे निकालात मुलीच वरचढ ठरल्या आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याच्या प्रमाण 68.72 टक्के इतके आहे. तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 55.72 टक्के इतके आहे.
यंदा बारावी परीक्षेचे मूल्यमापन 22 एप्रिल ते 18 मे या कालावधीत 81 केंद्रांवर झाले होते. परीक्षेत 91,106 विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये म्हणजेच 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीमध्ये 2,14,115, द्वितीय श्रेणीमध्ये 68,444 आणि तृतीय श्रेणीमध्ये 49,301 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा कन्नड विषयात 563 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत. इंग्रजीत 2, हिंदीमध्ये 124, समाजशास्त्र विषयात 85, राज्यशास्त्रात 80, बिझनेस स्टडीज विषयात 2,837, इतिहास 166, अर्थशास्त्र 1,472, हिंदूस्थानी संगीत 3, संस्कृत 1,119, उर्दु 4, लेखाशास्त्र 3,460, संख्याशास्त्र 2,266, मानसशास्त्र 81, भौतिकशास्त्र 36, रसायनशास्त्र 2,917, गणित 14,210, जीवशास्त्र 2,106, इलेक्ट्रॉनिक्स 236, कॉम्प्युटर सायन्स 4,868, सामान्य गणित 401, शिक्षण 658, होमसायन्स 12, माहिती तंत्रज्ञान 17 आणि ऑटोमोबाईल विषयाच्या पेपरमध्ये 20 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत.
राज्यातील चार सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्याचप्रमाणे दोन अनुदानित आणि 50 विनाअनुदानित पदवीपूर्व महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यंदा कोणत्याही महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के लागलेला नाही. कन्नड माध्यमातून परीक्षा दिलेल्यांपैकी 51.38 टक्के आणि इंग्रजी माध्यमातून परीक्षा दिलेल्यांपैकी 69.99 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
स्कॅनिंग प्रत, फेर मूल्यमापन
उत्तरपत्रिकेची स्कॅनिंग प्रत मिळविण्यासाठी 30 जूनपर्यंत अर्ज करण्यात येईल. अर्ज केलेल्यांना ही प्रत डाउनलोड करण्यासाठी 6 ते 10 जुलैपर्यंत मुदत असेल. स्कॅनिंग प्रत मिळविलेल्यांना फेर मूल्यमापनासाठी 7 ते 13 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. एका विषयाच्या उत्तरपत्रिकेच्या स्कॅनिंग कॉपीसाठी 530 रुपये तसेच फेरमूल्यमापनासाठी प्रत्येक विषयाला 1,670 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. फेरगुणमोजणीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क असणार नाही.
जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा
बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी 24 जून शेवटची मुदत आहे. तर दंडासहित शुल्क भरण्यासाठी 4 जुलै अखेरची मुदत आहे. पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जूनच्या शेवटच्या आठवडय़ात प्रसिद्ध केले जाणार आहे.









