सातारा :
साताऱ्याचे ऐतिहासिक गांधी मैदान आणि गांधी मैदानावरील सोमण व्यासपीठ ऐतिहासिक आहे. याच गांधी मैदानाच्या रस्त्यावर मंजू कॉन्स्टेबल मालिकेचे चित्रीकरण सुरू होते. शूटिंग पाहण्यासाठी गर्दी झाल्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला. यावेळी वाहतूक कोंडी झाली. यामध्ये माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांची गाडी अडकली होती. दरम्यान, या भररस्त्यातच शूटिंग करण्यासाठी परवानगी घेतली होती का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.
माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांची गाडी गुरुवारी दुपारी निवासस्थानाकडे चालली असताना अचानक समोर गर्दी, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, हातात बेड्या घातलेला गुंड, त्या पोलीस अधिकाऱ्याला प्रश्न विचारण्यासाठी पत्रकारांनी घेरलेले दृश्य पाहुन वेगळेच काहीतरी सुरु आहे असे त्यांना प्रथमत: वाटले. परंतु त्यांनी माहिती घेतली असता मंजू कॉन्स्टेबल या मालिकेचे चित्रीकरण सुरु होते. चित्रीकरण संपल्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्यानंतर ते पुढे मार्गस्थ झाले.
साताऱ्यात वाहतुकीची समस्या कायम आहे. त्यातच पावसाळ्यात सुद्धा अचानक कधी, कुठे वाहतूक कोंडी निर्माण होईल हे सांगता येत नाही. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास अविनाश कदम हे नेहमीप्रमाणे सातारा नगरपालिकेकडून त्यांच्या घराकडे चार चाकीतून निघाले. गाडी मोती चौकातून गोलबागेपासून राजवाडा चौपाटीच्या बाजूने वळवली. तोच त्यांना समोर काही पोलीस कर्मचारी, अधिकारी, काहींच्या हातात बेड्या, तर काही पत्रकार हातात माईक घेवून त्या वर्दीतल्या पोलीस अधिकाऱ्यास रस्त्यातच प्रश्न विचारत होते. त्यामुळे सगळी वाहतूक कोंडी झाली होती. त्यात अविनाश कदम हेही अडकले होते. अविनाश कदम यांनी गर्दी कशाबद्दल झाली आहे याची चौकशी केली तेव्हा त्यांना मालिकेचे चित्रीकरण सुरु असल्याचे सांगण्यात आले. चित्रीकरणातील ओके असा शब्द ऐकू येताच वाहतूक पूर्ववत झाली. हा सगळा चित्रीकरणाचा प्रकार भर पावसात सुरु होता.
- सातारा पालिकेने आणि वाहतूक शाखेने परवानगी दिली आहे काय?
सातारा शहरात कोणताही कार्यक्रम आयोजित करायचा असला की पालिकेची परवानगी घ्यावी लागते. तसेच नजिकच्या पोलीस ठाण्याकडून परवानगी घ्यावी लागते. मग या चित्रीकरणाची परवानगी सातारा पालिकेकडून आणि शाहुपूरी पोलीस व वाहतूक पोलिसांनी दिली होती काय?, परवानगी घेतली नसल्यास त्यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.








