फेटाळली साबरमती आश्रमासंबंधीची याचिका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गुजरात राज्यातील साबरमती आश्रमाच्या पुनर्विकासाला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ही याचिका महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी सादर केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे गांधी यांना दणका बसला आहे. तसेच या आश्रमाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रस्तावित पुनर्विकासामुळे या आश्रमाचे स्वरुप, परिसरातील नैसर्गिकता आणि पर्यावरण यांना धोका निर्माण होईल. त्यामुळे पुनर्विकास करताना तो 20राष्ट्रीय गांधी स्मारक निधी’ या संस्थेच्या अधिपत्याखाली करण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी तुषार मेहता यांच्या आपल्या यचिकेच्या माध्यमातून केली होती. या याचिकेची हाताळणी न्या. एम. एम. सुंद्रेश आणि न्या. राजेश राजेश बिंदल यांच्या खंडपीठाने केली. मंगळवारी या संबंधातील निर्णय देण्यात आला आहे.
केंद्र सरकारकडून शाश्वती
साबरमती आश्रम महात्मा गांधी यांनी स्थापन केला होता. केंद्र सरकारने या आश्रमाचा पुनर्विकास करण्यासाठी योजना सादर केली आहे. पुनर्विकास करताना आश्रमाच्या मुख्य भागाचे स्वरुप परिवर्तीत केले जाणार नाही. ते पूर्वीपासून जसे होते, तसेच ठेवले जाईल, असे स्पष्ट आश्वासन केंद्र सरकारने दिले होते. मात्र, पुनर्विकासाचे कार्य जेव्हा हाती घेतले जाईल, तेव्हा हे आश्वासन पाळले जाणार नाही, असे तुषार गांधी यांचे म्हणणे होते. केवळ संशयाच्या आधारावर पुनर्विकासाच्या विरोधात याचिका सादर केली जाऊ शकत नाही. तसेच ही याचिना सादर करण्यासाठी दोन वर्षांचा विलंब झाला आहे. त्यामुळे विलंबाच्या मुद्धावरही याचिका फेटाळली जात आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय
गांधी यांनी प्रथम गुजरात उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. या याचिकेच्या सुनावणी प्रसंगी केंद्र सरकारने हे आश्वासन दिले होते. हा आश्रम पाच एकरांच्या परिसरात साकारला आहे. हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. अधिकाधिका पर्यटकांना आकृष्ट करुन घेण्यासाठी केंद्र सरकारने हा पुनर्विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. आश्रमाच्या मुख्य ऐतिहासिक भागाला स्पर्शही केला जाणार नाही, असे स्पष्ट लेखी आश्वासन केंद्र सरकारने दिल्याने गुजरात उच्च न्यायालयाने गांधी यांची याचिका फेटाळली होती. सर्वोच्च न्यायालयानेही गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे आपल्या निर्णयात नमूद केले आहे.
पुनर्विकास कसा होणार आहे…
साबरमती आश्रम हा साबरमती नदीच्या तटानजीक असून त्याला गांधी आश्रम असेही नामोनिधान आहे. या आश्रमाची स्थापना 1917 मध्ये करण्यात आली होती. या आश्रमात मूळच्या वास्तूंची संख्या 40 आहे. या 40 वास्तूंना पुनर्विकास करताना हात लावला जाणार नाही. परिसरात इतरही कमी महत्वाच्या इमारती आहेत. त्यांची संख्या 200 हून अधिक आहे. या वास्तू नष्ट केल्या जाणार असून त्यांच्या स्थानी नव्या वास्तू साकारण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. आश्रम परिसरातील अनेक इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. त्यांचा पुनर्विकास करणे आवश्यक आहे, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.









