रत्नागिरी :
मासेमारी करताना मच्छीमार जाळ्यात अडकल्याने कासवांना दुखापत होत असते. अनेकवेळा जाळ्याचा धागा कासवांच्या शरीरात गेल्याने गंभीर जखम होते. कासवांवरील उपचार पद्धती गुंतागुंतीची असल्याने डहाणू व ठाणे जिल्ह्यातील ऐरोली येथे उपचार केंद्र आहेत. आता कोकण किनारपट्टीवर कासवांवरील उपचारासाठी दापोली व रायगडमधील अलिबाग येथे कासव उपचार केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती विभागीय वनाधिकारी कांचन पवार यांनी दिली.
शहरालगतच्या हॉटेल सावंत पॅलेस येथे कांदळवन प्रतिष्ठान व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने समुद्रीप्राणी स्टैंडिंग उपाययोजना व संवर्धन यासंबंधी मंगळवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार बोलत होत्या. पर्यावरणाचा समतोल व सागरी जैवविविधता अबाधित राखण्यासाठी कांदळवन व समुद्रजीव संवर्धन आज काळाची गरज आहे. हे करत असताना कोणत्याही एका विभागाला शक्य होणार नाही, असे पवार म्हणाल्या. यावेळी कस्टमचे सहाय्यक आयुक्त संदीप कृष्ण, बॉम्बे नॅचरलहिंस्टी सोसायटीचे संचालक किशोर रिठे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर, वन अधिकारी प्रियंका लगड आदी मान्यवर उपस्थित होते.








