गावातील 30 जणांचा महिनाभरात अकाली मृत्यू : आबालवृद्धांच्या शृंखला मृत्यूमुळे गाव भयभीत, आरोग्य विभागाने सत्य तपासण्याची गरज
बेळगाव : जेमतेम सात ते आठ हजार लोकवस्तीचे गाव. तालुका केंद्रापासून दोन किलोमीटर अंतरावरील या गावात शेती हाच मुख्य व्यवसाय. या गावात गेल्या महिनाभरात 30 जण आकस्मिकरित्या दगावले आहेत. त्यामुळे संपूर्ण गाव धास्तावले आहे. देवीचा कोपच या अकाली मृत्यूला कारणीभूत आहे, असा समज गावकऱ्यांचा झाला आहे. रामदुर्ग तालुक्यातील तुरनूर या गावात गेल्या महिनाभरात एकापाठोपाठ एक 30 जणांचा अपमृत्यू झाला आहे. पाच वर्षांच्या बालकापासून 70 ते 80 वर्षांच्या वृद्धापर्यंतच्या व्यक्ती गूढरित्या काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. गावात सुरू असलेली मृत्यूंची शृंखला कशी थांबवायची? असा प्रश्न गावकऱ्यांसमोर पडला आहे. त्यामुळे गावच्या दुर्गादेवीला गावकरी शरण गेले आहेत. पंधरवड्यात देवीचा कोप थांबविण्यासाठी जत्रा भरविण्याचाही निर्णय झाला आहे. एकापाठोपाठ एक मृत्यूच्या घटनांमुळे गावकरी भयभीत झाले होते. मृत्यूची कारणे तरी काय आहेत? लहान मुले, तरुणांच्या मृत्यूला कोणतीच कारणे नाहीत. वृद्धांचे मरण एक वेळ समजू शकते. पण युवावर्गाच्या मृत्यूमुळे सारे गावच धास्तावले आहे. या गावात दुर्गादेवी, बिरदेव, बसवाण्णा आदी विविध मंदिरे आहेत. दुर्गादेवीला तैलाभिषेक केला जातो. त्यामुळे मूर्तीवर तेलाच्या चिकटपणामुळे धुळीचा लेप जमा झाला. तो काढताना देवीच्या मूर्तीला धक्का पोहोचल्यामुळे देवी कोपली आहे. त्यामुळेच गावात मृत्यूची शृंखला सुरू आहे, अशी समजूत बळावली आहे.
दुर्गादेवीची मूर्ती साफ करताना तिच्या डोळ्याला धक्का लागला होता. अकाली मृत्यूच्या शृंखलेने गावकरी भेदरलेले असतानाच एका जोगतिणीच्या अंगात देवी भरली. ‘माझ्या डोळ्यांना धक्का पोहोचविला असणार. मात्र, माझे अंगभर डोळे आहेत. गावच्या गावच घेऊन जातो’, असे भाकीत त्या जोगतिणीच्या तोंडातून बाहेर पडले. त्यामुळे आधीच भयभीत झालेल्या गावकऱ्यांच्या धास्तीत भर पडली. दुर्गादेवीला होमहवन, अभिषेक करण्याचे ठरविण्यात आले असून गेल्या पंधरा दिवसांपासून देवीचा दरवाजा बंद ठेवण्यात आला आहे. मूर्तीला नवीन लेप लावण्याचे काम सुरू असून एक-दोन दिवसात हे काम पूर्णत्वास जाणार आहे. देवीचा कोप कमी करण्यासाठी मंगळवारी वारही पाळला जात आहे. येत्या पंधरवड्यात देवीची जत्रा भरवून तिची ओटी भरण्याचे ठरविले आहे. यासंबंधी अधिक माहिती मिळविण्यासाठी ‘तरुण भारत’ने तुरनूर येथील रहिवासी सिद्धलिंगप्पा धरेगौडर यांच्याशी संपर्क साधला असता केवळ महिनाभरात 30 जणांच्या अकाली मृत्यूने आम्ही धास्तावलो आहोत. देवी कोपल्यामुळे गावात मृत्यूची शृंखला सुरू असल्याची भावना बळावली आहे. त्यामुळेच जत्राही भरविण्यात येणार आहे. जेणेकरून देवीचा कोप शांत होईल, यासाठी धार्मिक कार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
नेमकी कारणे शोधण्याची गरज
तुरनूरमधील अकाली मृत्यूंच्या शृंखलेला नेमकी कारणे कोणती आहेत? याचा शोध घेण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाने करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या गावकऱ्यांनी देवीचा कोप शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी याला वैद्यकीय कारणे कोणती आहेत? याचाही शोध घेण्याची गरज आहे. संपूर्ण जिल्ह्यात तुरनूरमधील घटनेची चर्चा सुरू आहे. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनीही देवीच्या कोपाला ठळक प्रसिद्धी दिली आहे. आता आरोग्य विभागाने यामधील सत्य तपासण्याची गरज व्यक्त होत आहे.









