घर खरेदीसाठीही ग्राहकांचा प्रतिसाद
कोल्हापूर प्रतिनिधी
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमी दसरा सणाला बाजारपेठेत कोट्यावधींची उलाढाल झाली. दसऱ्यांच्या मुहूर्तावर नागरिकांनी सोने, दूचाकी, चारचाकी वाहनांसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तु मोठ्याप्रमाणात खरेदी केल्या. त्यामुळे गुजरीसह शहरातील सोन्याच्या दागिन्यांचे मोठे मॉल, दूचाकी, चारचकी वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री करणाऱ्या मॉलमध्ये दिवसभर ग्राहकांची मोठी गर्दी होती. तसेच घर खरेदीसाठी अनेक ग्राहकांनी विजयादशमीचा मुहूर्त साधला. त्यामुळे रो-हाऊस, फ्लॅट खरेदीसाठीही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळल्याचे बांधकाम व्यवसायिकांमधून सांगण्यात आले.
दसऱ्याच्या मुहूर्तावर विविध वस्तु खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. त्यामुळे मंगळवारी झालेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांनी खरेदीचा मुहूर्त साधला. खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची उत्स्फूर्त अशी गर्दी झाल्याने कोट्यावधींची उलाढाल झाली. यामुळे बाजारपेठेत एकप्रकारे चैतन्यच निर्माण झाले होते.
सोने बाजारपेठेत 50 कोटींहून अधिक उलाढाल
शहरात सोने खरेदीसाठी गुजरी ही प्रमुख बाजारपेठ आहे. त्यामुळे दसऱ्याच्यामुहूर्तावर सोने खरेदीसाठी गुजरीमध्ये दिवसभर नागरिकांची गर्दी होती. तसेच शहरातील विविध ठिकाणी झालेल्या मोठमोठ्या गोल्डमॉलमध्येही ग्राहकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे मंगळवारी दिवसभरात संपूर्ण जिल्ह्यात सोने खरेदी-विक्रीतून सुमारे 50 कोटीं रुपयांहून अधिकची उलाढाल झाल्याचे सराफ व्यवसायिकांमधून सांगण्यात आले.
दुचाकी-चारचाकी खरेदीसाठीही गर्दी
दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांनी दूचाकी-चारचाकी वाहनांची खरेदी केली. त्यामुळे वाहनांच्या शोरुममध्येही वाहने घरी नेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होती. वाहन उद्योगामध्येही दसऱ्याच्या मुहूर्तावर कोट्यावधींची उलाढाला झाली.
इलेक्ट्रॉनिक्स शोरुम हाऊसफूल्ल
मोबाईल, एलईडी टिव्ही, वॉशिंग मशिन, फ्रिज, ओव्हन, स्मार्ट वॉच, हेडफोन, मोबाईल अॅक्सेसरीज अशा विविध वस्तूंचीही दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठ्याप्रमाणात विक्री होते. त्यामुळे शहरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री करणारी शोरूम दिवसभर ग्राहकांच्या गर्दीने हाऊसफूल्ल राहिली होती. तसेच शोरुम चालकांकडूनही ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी भरघोस डिस्काऊंड, आकर्षक भेटवस्तू अशा विविध योजना राबविण्यात आल्या होत्या.
घर खरेदीसाठीही मोठा प्रतिसाद
शहरात घर खरेदीसाठीही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांनी रो-हाऊस, फ्लॅटचे बुकींग केले. शहरासह उपनगरात अनेक गृहप्रकल्पांचे काम सुरु आहे. अशा गृहप्रकल्पांमध्ये अनेकांनी रो-हाऊस, फ्लॅटचे बुकींग केले. त्यामुळे बांधकाम व्यवसायामध्येही मंगळवारी कोट्यावधी रुपयांची उलाढाला झाली.









