सोने-चांदी खरेदीला पसंती : वाहने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचीही विक्री वाढली, घर खरेदीसाठी उत्साह
बेळगाव : साडेतीन मुहूर्तापैकी एक विजयादशमी दिवशी बेळगाव बाजारपेठेत कोट्यावधींची उलाढाल झाली. सोने-चांदी, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, यांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली. यावर्षी कमी झालेल्या जीएसटीमुळे वाहनविक्री दुपटीने वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून रात्रीपर्यंत वाहनांची डिलिव्हरी देण्यामध्ये शोरुमचे कर्मचारी व्यस्त होते. दसऱ्यानिमित्त सराफी पेढ्यांवर खरेदीदारांची गर्दी झाली होती. सोने प्रतितोळा लाखाच्या वर पोहोचले तरी खरेदीदारांची संख्या मात्र काही कमी नव्हती. बेळगावसह शहापूर येथील सराफी पेढ्यांवर खरेदीदारांची मोठी गर्दी झाली होती. सोन्यासोबत चांदी तसेच हिऱ्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून आले. दागिन्यांपेक्षा ठोक सोने घेण्याकडे ग्राहकांचा अधिक कल होता.
यावर्षी केंद्र सरकारने जीएसटी कमी केल्याने दुचाकीसह चारचाकी वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली होती. गुरुवारी सकाळपासून वाहनांची डिलिव्हरी घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. दुचाकीसह चारचाकी व कमर्शियल वाहनांनाही ग्राहकांनी पसंती दिली. चन्नम्मा येथील गणेश मंदिर तसेच हिंडलगा येथील गणेश मंदिर येथे नव्या वाहनांची पूजा करण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. विजयादशमीनिमित्त फ्लॅट बुकिंग करण्यासोबत फ्लॅटचा ताबा मिळविण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू होती. त्याचबरोबर अनेकांनी नवीन दुकानांची सुरुवात तसेच घरांचे भूमिपूजन याच मुहूर्तावर केले. फ्लॅट बुकिंगसाठी आकर्षक डिस्काऊंटही देण्यात आला असल्याने घर खरेदीसाठी उत्साह दिसून आला. याबरोबरच मोबाईल, टीव्ही, वॉशिंगमशीन, फ्रिज, एसी, कुलर, ओव्हन या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू होती.
पारंपरिक दागिने खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल
सोन्याच्या दरामध्ये अलीकडील काही दिवसात प्रतितोळा 5 हजार रुपये एवढी लक्षणीय वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी व सण-उत्सवांचा हंगाम लक्षात घेता भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या लग्नसराईची तयारी सुरू असून ग्राहकांचा कल मोठ्या आणि पारंपरिक दागिन्यांच्या खरेदीकडे अधिक आहे. अशा काळात शुभमुहूर्त साधत सोन्यात केलेली गुंतवणूक ही दीर्घकालीन दृष्टिकोनातून फायदेशीर ठरू शकते.
– सिद्धार्थ अतुल शहा (संचालक, चंदुकाका सराफ ज्वेल्स)









