स्वत:च्या हौसमौजेखातर निष्पापांना वेठीस धरणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश
पणजी : स्वत:च्या हौसमौजेखातर धांगडधिंगाणा घालून आवाजाचे प्रदूषण करत संपूर्ण गावास वेठीस धरणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, पर्यायाने त्यांचाही आवाज बंद करा, असे निर्देश सर्व संबंधित सरकारी यंत्रणांना देण्यात आले आहेत. खरे तर प्रदूषण नियमांचे वारंवार उल्लंघन करणारी आस्थापने सील करण्याचे तसेच तेथील वाद्यवृंद आदी साहित्य/उपकरणे जप्त करण्याचेही पूर्ण अधिकार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळासह अन्य सर्व संबंधित यंत्रणांना आहेत. परंतु विविध कारणांमुळे त्यांचा वापर होत नाही. त्याचा गैरफायदा घेत सदर आस्थापने वारंवार नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले आहे. या सर्वांवर कठोर कारवाई करून त्यांचाच आवाज बंद करणे हाच उपाय असल्याच्या निर्णयाप्रत सरकार पोहोचले आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून खास करून किनारी भागात संगीत रजनीच्या नावाखाली रात्रभर कर्णकर्कष आवाजाने संगीत वाजवून पार्ट्या झोडणाऱ्या पर्यटकांच्या सुखोपभोगासाठी मोठमोठ्या हॉटेल्सकडून संपूर्ण गावास वेठीस धरण्यात येते. त्याविरोधात स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांकडे तक्रारी करून ग्रामस्थ थकले. खरे तर अशाप्रकारे गुर्मीत वावरणाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे. केवळ तक्रारी नोंदवून न घेता त्यांची उपकरणे जप्त करण्यात आली पाहिजे, तसेच सदर आस्थापन थेट सील करण्यात आले पाहिजे. तरच त्यातून इतरांवर वचक बसून हे प्रकार नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे. यात गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका सर्वात महत्वाची ठरणार आहे. याकामी त्यांना संबंधित उपविभागीय दंडाधिकारी, पोलीस आदी यंत्रणांनी सर्व सहकार्य केले पाहिजे. रात्री 10 च्या नंतर संगीत वाजत असल्याची तक्रार आल्यास तेथे प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्यात आली पाहिजे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.









