पोलिसांकडून तात्काळ तपास सुरू
सांगली प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या वसंतदादा मार्केट यार्डातील तिसऱ्या गल्लीतील सी. सी. काबरा यांच्या दुकानामधून 88 हजार रूपये किंमतीची हळदीची पोती चोरट्यांनी पळवून नेली आहेत. याबाबत काडाप्पा सदाशिव वारद (46, रा. कावेरी अपार्टमेंट फ्लॅट नंबर दोन नेमिनाथ नगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. विश्रामबाग पोलिसांनी तात्काळ याचा तपास सुरू केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मार्केट यार्डातील तिसऱ्या गल्लीत सी. सी. काबरा यांचे हळदीचे दुकान आहे. या दुकानातून 27 मार्च ते 31 मार्च या दरम्यान 22 पोती हळदीची चोरी करण्यात आली आहेत. यामध्ये एकूण एक हजार 100 किलो वजनाची हळद होती. ही हळद कोणी चोरी केली याची माहिती घेण्याचा प्रयत्न दुकानदाराने केला. पण, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे या चोरीची फिर्याद वारद यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या फिर्यादीनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. काही संशयितांकडेही चौकशी केली असून या चोरीचा लवकरच पर्दाफाश होईल, असे पोलिसांनी सांगितले.