आंतरपिक म्हणून शेतकऱ्यांकडून निवड : शेतकऱ्यांच्या महसुलात वाढ
वाळपई : सत्तरी तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून बागायतींमध्ये आंतरपीक म्हणून हळदीची लागवड करण्यात येत आहे. हळद शेतकऱ्यांसाठी महसूल देणारे चांगले उत्पादन आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेण्यात आले होते. यंदाही जवळपास 3 हेक्टर क्षेत्रामध्ये हळदीचे लागवड करण्यात येणार असून याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. यातून शेतकऱ्यांना आर्थिक महसूल प्राप्त होणार असल्याचा दावा कृषी खात्याने केला आहे. सत्तरी तालुका हा पूर्णपणे कृषीप्रधान असून जवळपास सर्वच भागात नारळ, केळी, सुपारी, आंबा, मिरी याची लागवड करण्यात येत होती. मात्र रानटी जनावरांचा उपद्रव यामुळे अनेक भागातील शेती बंद झालेली आहे. शेतीची जागा आत नारळ व सुपारीच्या झाडांनी घेतलेली आहे. मात्र आंतरपीक म्हणून हळद लागवड ही आता हळूहळू विकसित होऊ लागलेली आहे. बाजारपेठेमध्ये हळदीला चांगली मागणी आहे व कषी खात्याच्या आत्मा योजनेंतर्गत अनुदान स्वरूपात हळद प्राप्त होत असते. यामुळे हळदीच्या लागवडीकडे आता शेतकरी मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत. दरम्यान, सत्तरी तालुक्याच्या विविध भागांमध्ये यंदा 3 हेक्टर क्षेत्रामध्ये हळदीचे लागवड करण्यात येणार आहे. यासाठीची जमीन तयार करण्याचे काम सुरू झालेले आहे. शेतकऱ्यांना स्वावलंबी होण्यासाठी महत्त्वाची मदत होणार असल्याचे कृषी खात्याचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी जवळपास दीड हेक्टर क्षेत्रामध्ये हळदीची लागवड केली होती. यातून चांगले हळदीचे उत्पादन मिळाले होते. यंदा हे उत्पादन दुप्पट होण्याचा कृषी खात्याचा दावा आहे. अनेक शेतकऱ्यांना जमीन कशाप्रकारे तयार करावी व कशाप्रकारे हळदीची लागवड करावी याचे मार्गदर्शन दिलेले आहे. याची एक कार्यशाळा नुकतीच झाली. या कार्यशाळेतून हळदीची लागवड व त्याचे व्यवस्थापन संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याची माहिती विभागीय कार्यालयातून प्राप्त झालेली आहे. सत्तरी तालुक्याची जमीन ही हळदी लागवडीसाठी अत्यंत पोषक आहे. यापूर्वी पारंपरिक पद्धतीने हळदीचे लागवड करण्यात येत होती. आता मात्र व्यवहारीक स्तरावर हळदीचे लागवड होऊ लागलेली आहे. आत्मा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे बी बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान प्राप्त होत असते. यामुळे या हळदीच्या लागवडीच्या माध्यमातून सत्तरी तालुक्यांमध्ये चांगले महसूल प्राप्त होऊ शकतो, असे कृषी खात्याचे अधिकारी विश्वनाथ गावस यांनी सांगितले. हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र 1,25,800 हेक्टर असून उत्पादन 5,50,185 मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ 80 टक्के उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी 15 ते 20 टक्के फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली 8,500 हेक्टर क्षेत्र असून उत्पादन 42,500 मेट्रिक टन इतके होते.









